
जळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी (Rabi Sowing) सुरुवातीपासून बऱ्यापैकी आहे. ही पेरणी (Sowing) सरकारी आकड्यानुसार ८० टक्के एवढी झाली आहे. पेरणी यंदा १०० टक्के होईल, असे संकेत आहेत.
हरभऱ्याची (Chana Sowing) सर्वाधिक पावणेदोन लाख हेक्टरवर खानदेशात पेरणी झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील हरभरा पिकाची पेरणी सव्वालाख हेक्टरवर झाली आहे. त्यापाठोपाठ ज्वारीची पेरणी सुमारे ८० हजार हेक्टर एवढी झाली आहे. एकूण चार लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी (Rabi Crop Sowing) यंदा अपेक्षित होती.
यानुसार पेरणीदेखील होत आहे. हरभऱ्याची पेरणी सर्वत्र पूर्ण झाली आहे. तसेच काही भागांतील पेरणी अद्यापही सुरू आहे. गव्हाची पेरणी अनेकांनी २० ते २५ डिसेंबरपर्यंत केली. अनेकांनी फरदड कापूस पिकाचे नियोजन केले होते.
परंतु गुलाबी बोंड अळीचे संकट आणि कापूस दरातील अनिश्चितता यामुळे कापूस पीक मध्यंतरी अनेकांनी काढून त्यात रब्बी पिकांची पेरणी केली. ही पेरणी करताना गव्हास अनेकांनी पसंती दिली. गव्हाची पेरणी खानदेशात सुमारे ३० हजार हेक्टरवर झाली आहे.
मक्याची लागवडदेखील या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत अनेक भागात झाली आहे. कमी कालावधीत चांगले उत्पादन देणाऱ्या मका वाणांची निवड त्यासाठी शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे यंदा मक्याचे क्षेत्र खानदेशात ४५ हजार हेक्टरवर पोहोचले आहे.
जळगाव जिल्ह्यात सुमारे ३५ हजार हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. मक्याचे दर स्थिर होते. त्याचा चारा व धान्यास उन्हाळ्यात मागणी असते. मक्यास पाणी अधिक लागेल. शिवाय दोन फवारण्यादेखील घ्याव्या लागतात.
परंतु शेतकऱ्यांनी गहू, बाजरी ऐवजी चारा व उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी मक्यास पसंती दिली आहे. बाजरीची पेरणी सुरू आहे, अशी माहिती मिळाली.
कलिंगड लागवड अधिक राहण्याची शक्यता
कांदा लागवडदेखील खानदेशात सुरू झाली आहे. ही लागवड आणखी चार ते पाच दिवस सुरू राहील. यंदा ही लागवड सात ते साडेसात हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. जळगाव जिल्ह्यातील लागवड अडीच ते तीन हजार हेक्टरवर जाईल. धुळ्यातील कांदा लागवडदेखील तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक असणार आहे.
तसेच कलिंगड लागवडदेखील सुरू आहे. यंदा कांद्यापेक्षा कलिंगडाची लागवड अधिक राहील, असे चित्र आहे. अनेकांनी मका, गहू, कांद्याऐवजी दोन महिने ते ६५ दिवसांत हाती येणाऱ्या कलिंगड पिकास पसंती दिली आहे. कमी कालावधीत बऱ्यापैकी नफा देणारे पीक म्हणून शेतकरी कलिंगडाकडे वळले आहेत. कलिंगड घेतल्यानंतर त्यात पुढे कापूस किंवा पपई लागवडीचे नियोजन अनेकांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.