Savarkar Rahul Gandhi : सावरकर नव्हे तर शेतकऱ्यांवर राहुल गांधींचा फोकस

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यात सलग दोन दिवस विरोधाचा भडका उडाला. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथली शुक्रवारची (ता. १८) सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गट आणि मनसेने राहुल गांधींच्या विरोधात रान उठवले होते.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Agrowon

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यात सलग दोन दिवस विरोधाचा भडका उडाला. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथली शुक्रवारची (ता. १८) सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली. भाजप (BJP), बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गट आणि मनसेने राहुल गांधींच्या विरोधात रान उठवले होते. मनसेने ही सभा होऊ देणार नाही, अशीही डरकाळी फोडली होती. (Bharat Jodo Yatra)

तर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या विधानाशी सहमत नसल्याचं सांगत या मुद्यावरून महाविकास आघाडीत फुट पडू शकते, असा इशारा दिला होता. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राहुल गांधींचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी शेगावच्या सभेत सावरकरांबद्दल काय बोलतात, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. पण राहुल गांधी यांनी या सभेत सावरकरांबद्दल एका शब्दानेही भाष्य न करता सगळा फोकस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठेवला.

शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने आत्महत्या करीत आहेत, तर उद्योजकांचे हजारो कोंटीचे कर्ज माफ केले जात आहे. उद्योजकांना कर्जमाफी मिळत असेल तर शेतकऱ्यांना का नाही, असा सवाल राहुल गांधींनी केला. तसेच शेतकरी आत्महत्येस सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याची टीका त्यांनी केली. या सभेत त्यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : मोदी सरकारच्या काळात विमा कंपन्यांकडून लूट

‘‘शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे. या भागांत सहा महिन्यांत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामागची कारणे काय होती, याची उत्तरे कोणत्याही शेतकऱ्याशी चर्चा केली तरी मिळतील. शेतीमालाला योग्य भाव नाही. विम्याची रक्कम भरूनही नुकसान भरपाई मिळत नाही. ५० हजार, एक लाख रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतात. आमचे एक लाखाचे कर्ज माफ होत नाही, पण उद्योजकांचे शेकडो कोटींचे कर्ज माफ कसे होते, असा सवाल शेतकरीच करीत आहेत,’’ असे राहुल गांधी म्हणाले.

‘‘शेतकऱ्यांचे प्रश्न याआधीही होते. काँग्रेस राजवटीत आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून एक पॅकेज जाहीर केले. त्यातून त्यांना दिलासा मिळाला. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांनी मनात आणले तर ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा देऊ शकतात. पण, त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही,’’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : शेतकरी धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवावा लागेल ः राहुल गांधी

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यापासून राहुल गांधी सातत्याने शेतकरी प्रश्नांवर बोलत आहेत. विशेषतः पीकविमा आणि कर्जमाफीचा प्रश्न त्यांनी उचलून धरला आहे. शेगावच्या सभेतही त्यांनी याच मुद्यांवर सविस्तर भाष्य केलं. सावकरांबद्दल राहुल गांधी यांनी व्यक्त केलेली भूमिका नवीन नाही. ते पहिल्यांदाच या विषयावर बोलले, असेही नाही. यापूर्वीही अनेकवेळा त्यांनी अशाच प्रकारची मते मांडली होती.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वीपासून ते या विषयावर बोलत आहेत. सावरकरांबद्दलच्या त्यांच्या भूमिकेत सातत्य राहिले आहे. त्याबद्दल भाजप आणि संघ परिवाराकडून राहुल गांधी यांच्यावर तीव्र टीका झालेली आहे. तरीही महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा आल्यानंतर राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक हा मुद्दा पुन्हा एकदा उचलला असल्याचे मानले जात आहे.

मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे भारत जोडो यात्रेकडे शक्यतोवर दुर्लक्ष करत होते. सावरकरांच्या मुद्याच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांना भारत जोडो यात्रेला प्रसिध्दी देण्यास भाग पाडले. दोन दिवसांपासून या विषयावर वाद निर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष भाषणात मात्र राहुल गांधींनी या विषयावर भाष्य करण्याचे टाळत गुगली टाकली. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर बेरोजगारीच्या मुद्याला हात घातला.

दरम्यान, ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान शेगाव येथील सभेच्या निमित्ताने काँग्रेसने मोठे शक्तिप्रदर्शन केले. सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रतिनिधी म्हणून माजी मंत्री राजेश टोपे आणि राजेंद्र शिंगणे यांनी हजेरी लावली. सावरकरांबाबत शिवसेना आणि काँग्रेसची मते वेगवेगळी आहेत; परंतु, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी स्पष्ट करत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

"ही यात्रा मन की बात करण्यासाठी नाहीये. ही यात्रा तुमचा आवाज, तुमची वेदना समजून घेण्यासाठी आहे. मी विचार करतो की, भितीमुळे, तिरस्कारामुळे, हिंसेमुळे नुकसान होतं. द्वेषाने या देशाचा कधीही फायदा होणार नाही", असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना 'मन की बात' कार्यक्रमावरून डिवचलं. पंतप्रधानांनी मन की बात बंद करावी आणि सर्वसामान्य लोकांच्या वेदना ऐकून घ्याव्यात, असा टोला राहु गांधी यांनी लगावला.

राहुल गांधींच्या भाषणातील मुख्य मुद्देः

उद्योजकांना कर्जमाफी मिळत असेल तर शेतकऱ्यांना का नाही?

शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने आत्महत्या करीत आहेत, तर उद्योजकांचे हजारो कोंटीचे कर्ज माफ केले जात आहे.

शेतकरी आत्महत्येस सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत.

शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही.

पिकविम्याचा हप्ता भरूनही नुकसान भरपाई मिळत नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com