
नगर : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (MPKV) यंदा आतापर्यंत चार टन कांदा बियाण्याची विक्री (Onion Seed Sale) ऑनलाइन पोर्टलद्वारे केली आहे. दीड हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन खरेदीचा लाभ घेतला. यंदा सुमारे १० टन ७५९ किलो बियाणे (Onion Seed) महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध आहे.
शेतकऱ्यासाठी खरीप हंगामात दरवर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून उत्पादित व कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कांद्याचे ‘फुले समर्थ’ आणि ‘बसवंत ७८०’ या वाणांच्या बियाण्याची विक्री केली जाते. गेल्या वर्षीही ऑनलाइन कांदा बियाणे विक्री झाली होती. मात्र, पुरेसे बियाणे उपलब्ध नसल्यामुळे अवघ्या दोन तासांत बियाणे संपले होते. यंदा मात्र विद्यापीठाने १० टन ७५९ किलो कांदा बियाण्याचे उत्पादन घेतले. पहिल्या दिवशी २.५ टन, तर दुसऱ्या दिवशी १.५ टन कांदा बियाण्यांची विक्री झाली. ६.७ टन कांदा बियाणे शिल्लक आहे.
राज्याच्या काही भागात अजून पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकरी कांदा बियाणे खरेदीकडे वळालेले नाहीत. आतापर्यंत झालेल्या ऑनलाइन विक्रीत नगर, नाशिक, धुळे, जळगाव, मालेगाव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, अकोला, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी कांदा बियाणे खरेदी केले.
कांदा बियाण्यांसाठी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून पैसे भरले, अशा शेतकऱ्यांना हे बियाणे त्यांनी दिलेल्या पर्यायानुसार केव्हीके धुळे, केव्हीके बोरगाव, पिंपळगाव बसवंत संशोधन केंद्र आणि राहुरी कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्रावर उपलब्ध होईल. नोंदणीवेळी पोर्टलवर जमा केलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स आणि पैसे भरल्याची पावती बियाणे घेताना विक्री केंद्रावर जमा करणे आवश्यक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.