Rain Update Maharashtra : पावसाने मध्य महाराष्ट्राला झोडपले

कोकण, मराठवाडा, विदर्भातही हजेरी; खरीप पिकांना पुन्हा तडाखा
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोर करत सोमवारी (ता. १७) रात्री मध्य महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून (Heavy Rainfall) काढले. विजा, मेघगर्जनेसह मुसळधार कोसळलेल्या पावसाने अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. तर मराठवाडा, कोकण, आणि विदर्भातही हलक्या ते मध्यम पावसाने तडाखा दिला. या पावसाने काढणीस आलेल्या खरिपाच्या पिकांचे (Kharip Crop) मोठे नुकसान झाले आहे.

Rain Update
Kharip Crop Damage : नगर जिल्ह्यात पावसाने खरिपाची पिके हिरावली

दिवसभराच्या उघडिपीनंतर सायंकाळी अचानक पणे ढग जमा होत प्रचंड विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने पुणे, नगर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, धुळे, सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला. पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की, काही क्षणांत सर्वदूर पाणीच पाणी झाले. ओढे, नाल्यांना पूर आले, तर नद्याही दुथडी भरून वाहिल्या. धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने धरण आणि बंधारे ओसंडून वाहिले.

Rain Update
Rain Update : बुलडाणा जिल्ह्यात पावसाने चिंता वाढवली

नगर आणि पुणे जिल्ह्यात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. सोमवारी (ता. १७) रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी (ता. १८) पहाटपर्यंत सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसाने पिकांची मोठी नासाडी सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड येथे सर्वाधिक १३० मिलिमीटर पाऊस झाला,

तर पुणे शहर, बारामती, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. पाऊस सुरूच असल्याने नगर जिल्ह्यातील मुळा धरण, ओझर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नगर, पारनेर, तालुक्यांतील जोरदार पावसामुळे सीना नदीला पूर आलेला आहे.

मराठवाड्यात परतीच्या पावसाकडून औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांना झोडपणे सुरूच होते. या तीनही जिल्ह्यांतील १३ मंडळांत अतिवृष्टी झाली तर अनेक मंडळांत हलका, मध्यम, दमदार पाऊस झाला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र काही मंडळांत तुरळक हलका झालेला पाऊस वगळता पावसाने उसंतच घेतल्याचे चित्र होते. पावसाने कपाशीची बोंड काळी पडली असून वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. सोयाबीनची परिस्थिती यापेक्षा वेगळी नसून अनेक शेतातील सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.

तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. सेलू तालुक्यातील चिकलठाणा, मोरेगाव मंडळात जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव तालुक्यातील चार मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला.

Rain Update
Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीचा प्रवास जैसे थे!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी (ता. १८) सकाळपासूनच परतीच्या पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सायकांळी जिल्ह्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भात पीक कापणी रखडली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पिकावरील संकट अधिक गडद होत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : सावंतवाडी ४०, मानगाव, पेण, चिपळूण, वैभववाडी प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : सासवड १३०, सिन्नर १२०, पुणे ११०, बारामती, शेवगाव प्रत्येकी १००, पाडेगाव ९०, चाळीसगाव ७०, पाथर्डी, पाचोरा, सातारा प्रत्येकी ६०, खंडाळा ५०, जामनेर, वाई, संगमनेर, पन्हाळा, राधानगरी प्रत्येकी ५०, घोडेगाव, पारनेर, येवला प्रत्येकी ४०, श्रीगोंदा, जामखेड, नेवासा, राहाता, अकोले, कोल्हापूर, गगनबावडा, दिंडोरी, चिंचवड, शिरूर, पौड, लोणावळा, भडगाव प्रत्येकी ३०.

मराठवाडा : घनसावंगी ६०, कन्नड ४०, पैठण ४०, पाटोदा, गंगापूर, सोयगाव प्रत्येकी ३०.

विदर्भ : पारशिवणी ४०, ब्रह्मपुरी, सालकेसा, मालेगाव, नागपूर, मारेगाव प्रत्येकी ३०.

नुकसान दृष्टिक्षेपात...

- नाशिक जिल्ह्यात पावसाच्या तडाख्यात मका, बाजरी, सोयाबीन, कापूस, भात, नागली, वरई, भाजीपाला, खरीप कांदा या पिकांचे मोठे नुकसान.

- नवी पालवी फुटलेल्या, पोंगा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोग वाढत आहेत.

- नागली, वरई सारख्या तृणधान्य पिकांना फटका बसल्यामुळे खराब होणार.

- संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये गावात वीज कोसळल्याने महावितरणच्या विद्युत रोहित्रामध्ये बिघाड.

- सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम, भातपीक कापणी रखडली.

- मराठवाड्यात परतीचा पावसामुळे कपाशीची बोंड काळी पडली असून वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत.

- सोयाबीन पीक अनेक ठिकाणी पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com