कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार

मराठवाडा, विदर्भातही पावसाची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार
RainAgrowon

पुणे : मॉन्सूनचे आगमन (Monsoon Arrival) लांबले असले तरी राज्यात पूर्वमोसमी पाऊस (Preseason Rain) जोर धरण्याची शक्यता आहे. आजपासून (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस (Rain) वाढणार असून, उद्यापासून (ता. १०) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज (Rain Prediction) हवामान विभागाने वर्तविला आहे.

पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून छत्तीसगड, सीमांध्र, रायलसीमापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिण भारतात परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती असून, राज्यात पावसाला पोषक हवामान आहे.

विदर्भात उष्ण लाट कायम असून, चंद्रपूर गोंदिया, वर्धा, नागपूर, ब्रह्मपुरी येथे कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांच्या आसपास आहे. बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर, गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित विदर्भासह राज्यातही उन्हाचा चटका कायम असून, राज्यात उकाडा वाढत आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून, आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे.

बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.४, नगर ३६.६, धुळे ४१, कोल्हापूर ३२.७, महाबळेश्‍वर २७.१, नाशिक ३४.७, निफाड ३६.६, सांगली ३३.२, सातारा ३४.७, सोलापूर ३८, सांताक्रूझ ३४.५, डहाणू ३५.७, रत्नागिरी ३२.९, औरंगाबाद ३७.९, परभणी ३८.६, नांदेड ३९.८, अकोला ४३.५, अमरावती ४३.६, बुलडाणा ३९, ब्रह्मपुरी ४५.४, चंद्रपूर ४५.८, गोंदिया ४५.८, नागपूर ४५.४, वाशीम ४०, वर्धा ४५.५, यवतमाळ ४३.५.

मॉन्सून ‘जैसे थे’

नैॡत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) बंगालच्या उपसागरातील शाखेने पुढे चाल करत मंगळवारी (ता. ७) तमिळनाडूच्या काही भागातही प्रगती केली आहे. मात्र, अरबी समुद्रातून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारणाऱ्या मॉन्सून वाटचाल ‘जैसे थै’ आहे. मॉन्सूनच्या राज्यातील आगमनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

वादळी पावसाचा इशारा :

कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, परभणी.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com