पुणे शहरासह पश्चिम पट्ट्यात पावसाला सुरुवात

मावळ, मुळशी, वेल्हा, खेडला तुरळक सरी, लोणावळ्यात घाटमाथ्यावर हलका पाऊस
पुणे शहरासह पश्चिम पट्ट्यात पावसाला सुरुवात
Rain UpdateAgrowon

पुणे : शेतकऱ्यांना आतुरतेने वाट पाहायला लावणाऱ्या पावसाला (Rain) अखेर सोमवारी (ता.२०) सुरुवात झाली. शहरात पावसाच्या तुरळक (Light Rain) सरी बरसण्यास सुरुवात झाली असून, पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, वेल्हा, खेड भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. लोणावळ्याच्या घाटमाथ्यावर काहीसा हलका पाऊस पडत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा लागून राहिली आहे.

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून दमदार पाऊस नसल्याने शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. त्यातच पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी अधूनमधून पाऊस पडला. मात्र, गेल्या आठवड्यापासून कडक ऊन पडत असल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय अशी स्थिती झाली होती. दहा ते बारा दिवसांपूर्वी पूर्व पट्ट्यातील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती भागांत वादळी वाऱ्यासह कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडला. पूर्व भागाला उन्हाळ्यात जीवनदायी ठरणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी बरसत होत्या.

मॉन्सूनने राज्य व्यापल्यानंतर मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात बहुतांशी भागात ढगाळ वातावरण तयार झाले. सध्या अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तसेच, अधूनमधून ऊन पडत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात हवामान ढगाळ राहत असले तरी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन सायंकाळी तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीकामांना वेगाने सुरुवात केली आहे. तर, काही ठिकाणी पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस पुरेसा नसल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

सोमवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

मुळशी : माले ः १.५, मुठे ः १.५,

भोर - निगुडघर ः १.०

मावळ - वडगाव मावळ ः २.५, तळेगाव ः २.३, काले ः २.५, कार्ला ः ८.३, खडकाळा ः ३.८, लोणावळा ः ८.३,

वेल्हा - वेल्हा ः १.५, विंझर ः १.५,

खेड - राजगुरुनगर ः १.०, पाइट ः १.०, चाकण ः १.०, कडूस ः १.०

आंबेगाव - आंबेगाव ः ५.०,

बारामती - सुपा ः १.५,

इंदापूर - इंदापूर ः १३.०, बावडा ः २.३, काटी ः ३.०

दौंड - देऊळगाव ः २.३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com