
पुणे ः मागील वर्षभर हरभरा (Chana) शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरला. त्यामुळे उत्तरेतील राज्यांमधील शेतकऱ्यांनी गहू (Wheat) आणि मोहरीची लागवड (Mustard Cultivation) वाढवली. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगला दर देणारा पर्याय नव्हता.
त्यामुळे आतबट्ट्याचा ठरूनही हरभरा लागवड सर्वाधिक झाली. पण राज्यातील काही शेतकऱ्यांनी रब्बीत राजमा पिकाला (Rajma Cultivation) पंसती दिली.
राजमा कमी कालावधीचे पीक असून एकरी उत्पादनही जास्त मिळते. तसेच राजम्याची खरेदी गावातच करत असून, प्रतिक्विंटल ७ हजार ते ९ हजार रुपये दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जगात राजमा हे महत्त्वाचे कडधान्य पीक समजले जाते. भारतात मागील काही वर्षांपासून राजम्याचा विस्तार वाढतोय. वापर अधिक असल्याने भारताला दरवर्षी १ लाख ते १ लाख ५० हजार टन राजमा आयात करावा लागतो. देशात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि महाराष्ट्रात राजम्याची लागवड केली जाते.
महाराष्ट्रात मागील तीन ते चार वर्षांपासून रब्बी हंगामात राजम्याचे क्षेत्र वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये राजम्याचे क्षेत्र जास्त आहे. मात्र आता मराठवाडा आणि विदर्भातही लागवड वाढत आहे.
महाराष्ट्रात हरभरा हे मुख्य रब्बी पीक समजले जाते. मराठवाडा आणि विदर्भ या कमी पाण्याच्या भागात रब्बी हंगामात गहू आणि इतर रब्बी पिके घेण्यात मर्यादा येत होत्या.
पण आता राजम्यासारखा पर्याय उपलब्ध झाल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा मांडवा येथील शेतकरी श्रीराम मोरे यांनी सांगितले.
हरभऱ्याला पर्याय म्हणून लागवड
हरभऱ्याच्या तुलनेत शेतकऱ्यांना राजमा पीक कमी खर्चिक वाटत आहे. हरभरा पीक तीन ते साडेतीन महिन्यांचे आहे. तसेच हरभरा पिकाला मागील काही वर्षांपासून चांगला दर मिळत नाही.
मागील वर्षी तर शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा ८०० रुपये कमी दराने हरभरा विकावा लागला. हरभऱ्याला पाणीही जास्त लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी राजम्याचा पर्याय निवडला.
हरभऱ्याच्या तुलनेत राजमा फायदेशीर ठरत असल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदळवाडी येथील शेतकरी रमेश गाढवे यांनी सांगितले.
क्षेत्र विस्तारतेय
राजम्याचे पीक महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, वाशीम आणि अकोला जिल्ह्यांत कमी अधिक प्रमाणात घेतले जाते.
राजम्याच्या रूपाने रब्बीत शेतकऱ्यांना पर्याय मिळू शकतो, असेही काही शेतकरी सांगत आहेत. रब्बी हंगामात हरभरा काढणीसाठी मजुरांची टंचाई भासत होती.
तसेच मजुरीचे दरही वाढले. त्यामुळे कमी कालावधीचे राजमा पीक पर्याय म्हणून निवडल्याचे परभणी जिल्ह्यातील केहाळ येथील शेतकरी धीरज घुगे आणि नितीन जयस्वाल यांनी सांगितले.
गावातच खरेदी, दरही चांगला
मागील हंगामात हरभऱ्याला कमी दर मिळाला. त्यामुळे उत्तरेतील राज्यांमध्ये गहू आणि मोहरीची लागवड वाढली. मात्र महाराष्ट्रात या दोन्ही पिकांना मर्यादा आहेत. पाण्याची टंचाई आणि विक्रीसाठी बाजाराचा अभाव, या अडचणी गहू आणि मोहरीसाठी येतात.
त्यामुळे राज्यातील काही शेतकऱ्यांनी राजमा पर्यायी पीक म्हणून निवडले. सध्यातरी राजमा शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतोय. राजम्याचे एकरी उत्पादन ७ ते ९ क्विंटल मिळते. तर दर ७ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान मिळतो, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
आमच्या भागात जानेवारी महिन्यापासूनच सिंचनासाठी पाण्याची टंचाई निर्माण होते. राजमा हे अडीच महिन्यांचे पीक आहे. तसेच पाणीही कमी लागते. राजमा पिकावर कीड- रोगांचा प्रादुर्भावही कमी होतो. व्यापारी गावातूनच खरेदी करतात. मागील वर्षी राजम्याला ७ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता.
- श्रीराम मोरे, राजमा उत्पादक, सारोळा मांडवा, उस्मानाबाद
राजमा पीक हरभऱ्याच्या तुलनेत कमी खर्चिक आहे. हरभऱ्याचे एकरी ४ क्विंटल उत्पादन मिळत होते. मात्र राजम्याचे उत्पादन ७ ते ८ क्विंटल मिळाले. त्यामुळे आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीचे जवळपास ३०० सभासद राजम्याची लागवड करतात. राज्यातील आणि दक्षिणेतील व्यापारी गावातून खरेदी करतात. त्यामुळे मार्केटची अडचण नाही.
- डॉ. किरण गाढवे, तांदळवाडी, जि. उस्मानाबाद
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.