
महाड : फळांचा राजा असलेल्या आंब्याला (Mango) परदेशात चांगला दर मिळत असल्याने आपल्या बागेतील हापूस (Hapus Export) परदेशात जावा, यासाठी जिल्ह्यातील आंबा बागायतदार सरसावले आहेत. आंबा निर्यातीसाठी (Mango Export) मँगोनेट योजना राबवली जात आहे.
या अंतर्गत रायगडमधून गतवर्षी १ हजार ९७२ निर्यातक्षम आंबाबागांची नोंदणी झाली असून २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत मँगोनेट ऑनलाईन प्रणालीवर नोंदणीचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यात करण्यासाठी कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणच्या (अपेडा) मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबाबागांची नोंदणी केली जाते. आंबा निर्यात करणाऱ्या बागायतदारांना नोंदणी सोयीची व्हावी यासाठी मँगोनेट ही ऑनलाईन प्रणाली १ डिसेंबरपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी अपेडामार्फत फॉर्म रजिस्ट्रेशन मोबाईल अॅप उपलब्ध आहे.
निर्यात आंबा बागांची नोंदणी पाच वर्षांसाठी वैध असल्याने गतवर्षी नोंदणी केलेल्या आंबा बागांची नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. परंतु २०२२-२३ या वर्षासाठी नव्याने नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२, ८ अ, बागेचा नकाशा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. मँगोनेटद्वारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे.
नियम पाळणे बंधनकारक
जागतिक व्यापार संघटनेच्या प्रत्येक निर्यातदार देशांना स्वच्छतेविषयक व पिक स्वच्छतेविषयक नियम पाळणे सक्तीचे आहे. मॅगोनेट प्रणालीमध्ये आंब्याच्या पूर्वइतिहास (ट्रेसेबिलीटी) उपलब्ध असल्याची खात्री देणे आवश्यक आहे. शेतकरी प्रशिक्षण, बागांची तपासणी, पीक संरक्षण अभिलेख ठेवणे आवश्यक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.