
Nashik News : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १८) दुपारी झालेल्या कांद्याच्या लिलावात प्रतवारीनुसार दर न मिळाल्याने शेतकरी सुधीर काजळे यांनी व्यथा मांडण्यासाठी बाजार समितीचे कार्यालय गाठले. मात्र या ठिकाणी सचिवांनी बाजू तर ऐकून घेतली नाही. या वेळी कार्यालयात आलेले नांदगावचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनीही शेतकऱ्यालाच अरेरावी केली.
हा प्रकार काजळे यांचा पुतण्या मोबाइलमध्ये चित्रीकरण करत असताना त्याला दमदाटीचा प्रकार घडला. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत असताना त्याला दिलासा देण्याऐवजी अरेरावी करून अपमानित करण्यात येते, अशी कैफियत काजळे यांनी मांडली.
मांडवड (ता. नांदगाव) येथील शेतकरी सुधीर माधवराव काजळे हे गुरुवारी (ता. १८) मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कांदा विक्रीसाठी आले होते. मात्र कांद्याला २९० रुपये क्विंटल दर मिळाला.
कांद्याच्या प्रतवारीप्रमाणे बोली लागली न लागल्याने शेतकऱ्याने हरकत घेतली. यावर व्यापाऱ्याने सकारात्मक उत्तर दिले नाही. त्यानंतर घडलेला प्रकार मांडण्यासाठी काजळे यांनी सचिवांचे कार्यालय गाठले.
मात्र सचिवांनी त्यांची बाजू ऐकून घेतली नाही. आम्ही काय करू? तुम्हाला कांदा द्यायचा तर द्या, नाहीतर परत घेऊन जा, अशा शब्दात चर्चा टाळली. या वेळी शेतकऱ्याला न्याय का नाही, असा सवाल काजळे यांनी केला. नांदगावचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे तेथे होते.
व्यापाऱ्याला बोलावून घ्या व काय अडचण आहे हे विचारून घ्या, असे काजळे सांगत असतानाच तहसीलदार त्यांच्यावर भडकले. काजळेंचा पुतण्या मोबाईलमधून चित्रीकरण करत असताना त्याचा मोबाईल तहसीलदारांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तुला काय करायचे आहे ते कर, अशी अरेरावी केल्याची तक्रार काजळे यांनी केली.
सचिव म्हणतात, ‘प्रकार नजरचुकीने घडला’
सचिव बाळासाहेब राठोड यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा प्रकार नजरचुकीने घडला आहे. शेतकरी कार्यालयात आला असता तो आरडाओरड करत होता. दुसऱ्या दिवशी बाजार समिती सभापती निवड असल्याने त्या वेळी तहसीलदार आले होते.
यापूर्वी निवडणूक प्रक्रियेत हाणामारी झाली असल्याने त्यांनी हाच प्रकार आहे का, असे वाटले. त्यामुळे ओरडू नको, असे तहसीलदार सांगत होते. त्यामुळे हा प्रकार नजरचुकीने घडला असे सांगितले.
घडलेल्या प्रकाराबाबत जर त्यांचा मोबाईल तहसीलदारांनी हिसकवला नाही, असे आपण सांगता तर याबाबत आपल्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मिळेल काय, असे विचारले असता, कार्यालयातील सीसीटीव्ही बंद आहे, असे सांगून राठोड यांनी बोलणे टाळले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.