
Food Processing Industry मुंबई ः ‘‘भारत आणि जपान यांचे पूर्वापार संबंध आहेत. ते अधिकाधिक दृढ होण्यास महाराष्ट्र आणि वाकायामासारख्या प्रांताचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. पर्यटन (Tourism) आणि अन्न प्रक्रियेबाबतच्या (Food Processing) सामंजस्य करारामुळे यापुढेही हे संबंध अधिक दृढ होतील,’’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.
गेटवे ऑफ इंडिया येथे शनिवारी (ता. ४) महाराष्ट्र शासन आणि जपानचा वाकायामा प्रांत यांच्यातील सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले.
या वेळी विधान सभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वाकायामाचे गव्हर्नर किशीमोटो शुहेही, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. या वेळी सुमो व महाराष्ट्रीयन कुस्तीची प्रात्यक्षिके खेळाडूंनी सादर केली. ‘लेझर शो’चे देखील या वेळी झाला.
शिंदे म्हणाले, ‘‘ऑक्टोबर २०१३ मध्येच उभयतांमध्ये पर्यटन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबंधित करार झाला आहे. या कराराची ही दशकपूर्ती आहे.’’
ॲड. नार्वेकर म्हणाले, ‘‘सुमो जपानमध्ये लोकप्रिय असून, महाराष्ट्रात कुस्ती लोकप्रिय आहे. या समान धाग्यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील.’’
फडणवीस म्हणाले, ‘‘पर्यटनाच्या क्षेत्रात जपानने खूप मदत केली आहे. जपानमध्ये महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाचे कार्यालय आहे आणि संभाजीनगरमध्ये जपानचे कार्यालय आहे. या नवीन सामंजस्य करारामुळे जपान आणि राज्याचे संबंध अधिकच मजबूत होतील.’’
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी- शर्मा, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, जपानचे ४५ जणांचे शिष्टमंडळ आदी उपस्थित होते
‘अजिंठा अभ्यागत केंद्रासाठी ३०० कोटी’
पर्यटनमंत्री लोढा म्हणाले, ‘‘अजिंठा अभ्यागत केंद्रासाठी वाकायमा शासनाने ३०० कोटी रुपयांचे सहकार्य केले. पर्यटन क्षेत्रातच फक्त या सामंजस्य करारामुळे मदत होणार नसून अन्य क्षेत्रांतही प्रगती होईल.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.