
Pune APMC News पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (Pune APMC) परवानाधारक गाळेधारकांच्या नावावर बेकायदा व्यवसाय करणाऱ्या डमी अडत्यांचा (Dummy Adtiya) सुळसुळाट रोखण्यासाठी त्यांच्याकडून मासिक भाडे आकारणीचा बाजार समितीचा प्रस्ताव पणन संचालनालयाकडे धुळखात पडला आहे. यामुळे बाजार समितीला दैनंदिन लाखो रुपयांच्या उत्पन्नावर (APMC Income) पाणी सोडावे लागत आहे.
बाजार समितीमधील अनेक अडत्यांनी बेकायदेशीरपणे स्थानिक आणि परप्रांतीय लोकांना दैनंदिन दोन ते पाच हजार रुपये आकारून व्यवसाय करत आहेत. मात्र याद्वारे बाजार समितीला कोणतेही उत्पन्न मिळत नाही.
तर फूल बाजारात गाळ्याबाहेर व्यापार करणाऱ्यांकडून मासिक आकारणी केली जाती. यानुसार फळे आणि भाजीपाला विभागात देखील डमी अडत्यांकडून दरमहा दहा हजार रुपये शुल्क आकारण्यासंबंधी बाजार समितीने पणन संचालनालयाकडे पाठवलेला प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अभिप्रायासाठी प्रलंबित आहे.
फूल बाजारात जुलै २०११पासून अडत्यांना गाळ्यांसमोरील जागेच्या वापरासाठी शुल्क द्यावे लागत आहे. मात्र, फळविभाग, पालेभाज्या आणि तरकारी विभागातील परवानाधारक अडत्यांच्या गाळ्यांसमोरील जागेचा वापर करणाऱ्या डमी अडत्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.
मात्र, परवानाधारक अडते त्यांच्या गाळ्यांसमोर बसणाऱ्या डमी अडत्यांकडून दैनंदिन भाडे वसूल करतात.
फूल बाजाराप्रमाणेच जुलै २०११पासून डमी अडत्यांना अतिरिक्त शुल्क आकारले असते, याच धर्तीवर फळे भाजीपाला विभागात देखील डमी अडत्यांकडून दरमहा भाडे आकारणीचा प्रस्ताव पणन संचालनालय आणि जिल्हा उपनिबंधकांकडे प्रलंबित असल्याने, बाजार समितीला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.
डमींचा सुळसुळाट, शेतकऱ्यांची फसवणूक
प्रत्येक परवानाधारक अडत्याच्या गाळ्यासमोर ठरावीक जागेत दोन जणांना व्यापारास मान्यता आहे. मात्र, सध्या बहुतांशी गाळ्यांसमोर दोनपेक्षा अधिक डमी अडते व्यवसाय करतात. काही गाळ्यांवरील डमी अडत्यांची संख्या आठ ते दहा पर्यंत पोहोचली आहे.
यामध्ये अनेक परप्रांतीय असून, शेतकऱ्यांकडून हिशोब पट्टी न करता परस्पर शेतीमाल खरेदी करून, जास्त दराने विक्री करत असल्याचे चित्र सध्या बाजार आवारात आहे.
यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, अनेक परप्रांतीय डमी अडत्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याच्या देखील तक्रारी समोर येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.