
Sharad Pawar Nashik News नाशिक ः बांगलादेश, युरोप खंड, अमेरिका या भागात द्राक्ष निर्यात (Grape Export) होतात. हल्ली बांगलादेशाने मोठे निर्यात शुल्क (Export Duty) लावल्याने तिकडे द्राक्ष पाठवणे शक्य नाही. सध्या शेती, ऊस, फळांचा धंदा थोडा अडचणीत आला आहे. साखरेला उठाव नाही.
यासंदर्भात अनेक कारखान्यांनी देशाच्या राज्यकर्त्यांना निर्यात शुल्क कमी करण्यासाठी पत्र पाठविले आहे. अनेक कारखान्यांत साखर शिल्लक आहे. निर्यातीवर मर्यादा आल्या. त्यामुळे नवीन काम करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याच्या असावणी (डिस्टिलरी) इथेनॉल प्रकल्पाचा प्रारंभ शुक्रवारी (ता.१०) श्री. पवार यांच्या हस्ते झाला.
अध्यक्षस्थानी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ होते. आमदार छगन भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, नितीन पवार, दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, गणपतराव पाटील, दत्तात्रेय पाटील, सदाशिव शेळके, संजय पडोळ आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘सध्या संसदेत सत्ताधारी पक्षातील मंडळी देशाची किंमत जगात वाढली हे सतत सांगतात. देशाच्या पंतप्रधानांची किंमत जगात वाढणे, या गोष्टीचा आनंद आहे.
पण जगात किंमत वाढली तरी शेजारील बांगलादेशला काही सांगितले तर ते ऐकत नाहीत. याचा अर्थ इतकाच आहे की आम्ही स्वत:ची प्रतिष्ठा ही महत्त्वाची समजतो आणि देशाच्या कष्टकऱ्यांची आणि घाम गाळणाऱ्यांची जी प्रतिष्ठा आहे, त्यासाठी आम्ही सत्तेचा वापर करत नाही. त्याचा परिणाम हा देशातील शेती व्यवसायावर होऊ लागला आहे.’’
‘शेतकऱ्याला सन्मानाने संसार करता येईल एवढेच द्यावे’
‘‘कष्टकऱ्यांचे नुकसान होत असतानाही राज्यकर्ते धोरणात्मक निर्णय घ्यायला तयार नसतील, आमच्याशी कोण संघर्ष करू शकतो? अशी भूमिका मांडत असतील तर आम्हाला तुमच्याशी संघर्ष करायचा नाही. काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला सन्मानाने संसार करता येईल एवढेच द्यावे, अशी आमची भूमिका आहे,’’ असेही श्री. पवार म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.