मॉन्सून लांबणीवर पडल्याने भात पीक संकटात

सकाळी ढगाळ, दुपारी कडाक्याचे ऊन आणि सायंकाळी आकाशात काळोख निर्माण होत असल्याने पाऊस नक्की येईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे; पण ती फोल ठरत आहे.
Paddy Cultivation
Paddy CultivationAgrowon

कोवाड, जि. कोल्हापूर : पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील भात पेरणी (Paddy Cultivation) आटोपली; पण पेरणीनंतर मॉन्सून लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस नसल्याने भात उगवणीवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे लागले आहेत. पाऊस नसल्याने कोवाड परिसरातील जवळपास ७०० हेक्टर क्षेत्रातील भात पेरणी संकटात आली आहे. पेरणीनंतर उगवण व्यवस्थित झाली नसल्याने शेतकऱ्यांत धास्ती वाढली आहे.

सकाळी ढगाळ, दुपारी कडाक्याचे ऊन आणि सायंकाळी आकाशात काळोख निर्माण होत असल्याने पाऊस नक्की येईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे; पण ती फोल ठरत आहे. काही शेतकरी कृषी पंपांच्या साहाय्याने पाणी देण्याचे काम करत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी संपूर्ण तालुक्यात दोन दिवस जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पूर्व मोसमी पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. त्यामुळे खरिपातील पेरणी खोळंबली होती.

दोन दिवसांनंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचा जोर धरला. आठ दिवसांत तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी कुरीच्या साह्याने भाताची पेरणी आटोपली. पेरणीनंतर पावसाची गरज होती; पण अद्याप पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. महागडी बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असल्याने शेतकऱ्यांना बियाण्यांच्या उगवणीची काळजी लागली आहे. गेले पंधरा दिवस कडाक्याचे ऊन पडले आहे.

पेरणीनंतर बरेच दिवस झाले. पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी भाताची उगवण चांगली झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बियाणे खराब होण्याची भीतीही शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या आठ दिवसांत पाऊस झाला नाही, तर येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे असे दिसते.

कोवाड परिसरात पूर्वीपासून भाताची धूळवाफ पेरणी केली जाते. मॉन्सूनच्या तोंडावर ही पेरणी केली जाते. या वर्षी पूर्वमोसमी पाऊस जोरदार झाल्याने शेतकऱ्यांनी तत्पूर्वी पेरणी आटोपली; पण त्यानंतर गेले पंधरा दिवस पाऊस नसल्याने भाताची उगवण व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

रामू पोमाणी, शेतकरी, कोवाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com