Landslide: भूस्खलनाचा धोका; ८० कुटुंबांचे स्थलांतर

तहसीलदार कार्यालयात चोवीस तास आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (Disaster Management Control) सुरू करून नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लाइफ जॅकेट, रिंग, रोप, बॅग्ज, मेगाफोन, बॅटरी हे साहित्य उपलब्ध केले आहे.
Sangli News | Rain Updates in Sangli
Sangli News | Rain Updates in SangliAgrowon

शिराळा, जि. सांगलीः शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने शिराळा पश्चिम भागातील भूस्खलनाचा (Landslide) धोका निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाच वाड्या-वस्त्यांपैकी चार ठिकाणच्या ८० कुटुंबांतील २५० नागरिकांचे तातडीने स्थलांतर (Migration) करुंगली येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात करण्यात आल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली. (Rain Updates in Sangli)

यावेळी शिंदे म्हणाले, की भाष्टेवस्ती, कोकणेवाडी, धामणकर वस्ती, मिरूखेवाडी, डफळेवाडी या पाच वाड्या-वस्त्यावरील डोंगरांना भेगा पडल्या आहेत. घरात पाण्याचे उमाळे लागले आहेत. त्यामुळे भूस्खलनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने भाष्टेवस्ती, कोकणेवाडी, धामणकर वस्ती, मिरूखेवाडी येथील सध्या ८० कुटुंबातील २५० लोकांचे स्थलांतर (Migration) केले आहे.

स्थलांतरित केलेल्या नागरिकांना चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण याची सोय करण्यात आली आहे. यासाठी ग्रामसेवक, तलाठी, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य योग्य ते नियोजन करत आहेत. स्थलांतरित लोकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली आहे. शेतीची कामे व जनावरांची देखभाल करण्यासाठी सकाळी लोक गावाकडे जाऊन सायंकाळी परत मुक्कामी येणार आहेत. वृद्ध व लहान मुले मुक्कामीच राहणार आहेत. डफळेवाडी येथे सध्या जास्त धोका नसल्याने त्या लोकांचे अद्याप स्थलांतर करण्यात आलेले नाही.

तहसीलदार कार्यालयात चोवीस तास आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (Disaster Management Control) सुरू करून नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लाइफ जॅकेट, रिंग, रोप, बॅग्ज, मेगाफोन, बॅटरी हे साहित्य उपलब्ध केले आहे. तालुक्यातील स्वयंसेवी संस्था, शोध व सुटका पथक यांची माहिती संकलित करून त्यांना आपत्तीवेळी कोणत्या प्रकारे मदतकार्य करावयाचे, याबाबत प्रशिक्षण व माहिती देण्यात आली आहे.

गावनिहाय आराखडे करून ब्लू व रेड लाईनमध्ये येणाऱ्या घरांची, नागरिकांची माहिती तयार केली आहे. बुलडोझर, पाण्याचे टँकर, अर्थमूव्हर, जनरेटर आदींचे नियोजन केले आहे. गतवर्षी सागाव, मराठेवाडी, काळुंद्रे, मांगले, देववाडी, कांदे, कोकरूड येथे पुराचा जास्त फटका बसला होता. यावेळी मांगले, सागाव, कोकरूड, आरळा, चरण या पाच ठिकाणी बोटींची व्यवस्था करण्यात आली असून बोटींची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

या पाच वाड्या-वस्त्यांवर भूस्खलनाचे सावट

भाष्टेवस्ती १२, कोकणेवाडी ४७, धामणकर वस्ती ७, मिरूखेवाडी ५३, डफळेवाडी २३ कुटुंबातील ६७९ लोकांवर भूस्खलनाचे सावट आहे.

भूस्खलनाची लक्षणे ही आहेत लक्षणे..

घरांना तडा जाणे, डोंगरांना भेगा पडणे, झाडे वाकणे, झऱ्यातून लाल पाणी येणे ही भूस्खलनाची प्रमुख लक्षणे आहेत. ही सर्व लक्षणे भाष्टेवस्ती, कोकणेवाडी, धामणकरवस्ती, मिरूखेवाडी, डफळेवाडी येथे दिसून येत आहेत. जास्त प्रमाणात चारी लक्षणे ही डफळेवाडीत दिसून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून जास्त काळजी घेतली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com