
अकोला ः विभागात पानपिंपरी या वनौषधीची शेती (Agricultural) करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव २०२२-२३ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) फळबाग लागवड (Orchard Plantation) कार्यक्रमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहेत.
मात्र, यासाठी पानपिंपरी पिकाचे अंदाजपत्रक कृषी आयुक्तालय स्तरावरून मिळण्याची गरज आहे.
शासन निर्णयानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (Manrega Scheme) फळबाग लागवड योजनेस मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयामध्ये लागवडीसाठी पानपिंपरी या पिकाचा समावेश केला आहे.
अकोला, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यांत पानपिंपरीची मोठ्या प्रमाणात दरवर्षी लागवड वाढत आहे. एकट्या अकोला जिल्ह्यात २०० हेक्टरपर्यंत लागवड असल्याचे सांगितले जाते.
सध्या पानपिंपरीची लागवड सुरू झाली आहे. यापूर्वी पानपिंपरीला आयुष्यमान योजनेतून पाठबळ मिळत होते; मात्र, तो लाभ २०१६ पासून बंद करण्यात आला होता.
वास्तविक हे तांत्रिक स्वरूपाचे पीक असून या पिकात कामासाठी मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो.
व्यवस्थापनावर प्रचंड खर्च उत्पादकाला झेलावा लागतो. त्यामुळे हे पीक उत्पादनासाठी पाठबळ मिळावे या हेतुने शेतकरी सातत्याने मागणी करीत होते.
गेल्या काळात अशा स्वरूपातील पिकांच्या दृष्टिने शिफारशीसाठी अमरावती विभागीय औषधी वनस्पती उत्पादक शेतकरी समितीची स्थापना शासनस्तरावर केली गेली.
या समितीच्या बैठकांमध्ये सदस्य प्रभाकर ताडे, गजानन अकोटकर व इतरांनी सातत्याने हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर समितीची शिफारस शासनाकडे पाठवण्यात आली.
आता पानपिंपरीचा २०२२-२३ वर्षात रोजगार हमी योजना फळबाग लागवड कार्यक्रमात समावेश करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना किमान काही तरी आर्थिक पाठबळ उपलब्ध होऊ शकेल.
अंदाजपत्रकाची मागणी
पानपिंपरी पिकाची सध्या लागवड सुरू झाली आहे. अमरावती विभागात अकोला, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांत बरेच शेतकरी पानपिंपरी लागवडीस तयार आहेत.
या पिकाचे अंदाजपत्रक उपलब्ध नसल्याने यंत्रणांना क्षेत्रीयस्तवर लागवडीबाबत अडचणी येत आहेत.
या लागवडीचा कालवधी लक्षात घेता पानपिंपरी पिकाचे अंदाजपत्रक उपलब्ध करून देण्याची मागणी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनीही कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन संचालकांकडे केल्याचे समजते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.