Rose Export : ‘व्हॅलेंटाइन डे’साठीची गुलाब निर्यात कोल्हापुरातून ठप्प

उत्पादकांकडून फूल उत्पादन बंद; देशांतर्गत बाजारावरच भिस्त
Rose Export
Rose ExportAgrowon

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : प्रत्येक वर्षी अनेक देशांमध्ये व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) दिवशी प्रेमीयुगलांच्या हातात दिसणारा कोल्हापूरचा गुलाब (Kolhapur Rose) यंदा मात्र दिसणार नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यातील बहुतांश उत्पादकांनी फूल उत्पादन (Flower producer) बंद केल्याने याचा थेट फटका यंदा निर्यातीला बसला आहे. जिल्ह्यातून दरवर्षी होणारी सुमारे ३० लाख फुलांची निर्यात (Rose Export) यंदा पूर्णपणे ठप्प आहे.

जिल्ह्यातील गुलाब फूल उत्पादक सध्या स्थानिक बाजारपेठेवरच अवलंबून आहेत. सध्या गुलाबास देशांतर्गत बाजारपेठेत ८ ते १४ रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.

अजूनही फूल उत्पादक लग्नसराईसाठी गुलाब काढणीलाच प्राधान्य देत आहेत. अकरा तारखेनंतरच देशांतर्गत बाजारात ‘व्हॅलेंटाइन डे’साठी गुलाबाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

Rose Export
‘व्हॅलेंटाइन डे’साठी फुलला गुलाब

प्रतिकूल हवामानामुळे अडचणीत वाढ
बदलत्या हवामानामुळे फूल उत्पादकांना फटका बसत आहे. मध्यंतरीच्या काळात थंडी आणि ढगाळ हवामान असे संमिश्र वातावरण राहिले.

ढगाळ हवामानामुळे परिपक्वता लवकर आल्याने पंधरवड्यापूर्वीच फुलांची आवक बाजारात वाढली. आता आवक कमी झाली आहे.

‘व्हॅलेंटाइन डे’च्या अंतिम टप्प्यात स्थानिक बाजारात फुलाची दरवाढ होईल, अशी अपेक्षा फूल उत्पादकांची आहे.

Rose Export
Rose Processing : गुलाब प्रक्रियेला चांगली संधी

कोरोनानंतर उद्योग सावरलाच नाही
कोरोना पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून प्रत्येक वर्षी सुमारे ३० लाख फुलापर्यंत निर्यात होत होती. विशेष करून शिरोळ तालुक्यात मातब्बर उत्पादक होते. २५ जानेवारीपासून हरितगृहामध्ये फुले परदेशात पाठवण्यासाठी लगबग सुरू असायची.

ऑस्ट्रेलिया, इटली, जपान, ग्रीस, लंडनसह युरोपियन देशात निर्यात होत होती. कोरोना कालावधीत चित्र बदलले.

मागणी नसल्याने कोट्यवधी रुपयाचा दणका फूल उत्पादकांना बसला. या फटक्यातून आजपर्यंत फूल उत्पादक सावरला नाही.

अनेकांनी हरितगृह काढून तिथे अन्य पिकांची लागवड केली. सध्या गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अगदी दहा ते पंधरा टक्क्यांवरच जिल्ह्यातील फूल शेती सुरू असल्याचे चित्र आहे.

लग्नसराईसाठी तोडणी सुरू
सध्या लग्नसराई सुरू आहे, यासाठीच सध्या फुलांची तोडणी सुरू आहे. देशांतर्गत बाजार व्हॅलेंटाइन डेसाठी शेवटच्या चार दिवसांत तयारी करतो.

यामुळे दहा ते अकरा तारखे नंतरच हळूहळू व्हॅलेंटाइन डेसाठी गुलाबाला मागणी वाढेल, अशी शक्यता आहे. मात्र सगळीकडून अचानक गुलाबाची आवक झाल्यास दरही कमी येण्याचा धोका असल्याचे फूल उत्पादकांनी सांगितले.

निर्यातीसाठी वाढलेले भाडे व अन्य घटकातील अडचणीमुळे फूल उत्पादकांनी देशांतर्गतच विक्रीला प्राधान्य दिल्याचे सध्याचे चित्र आहे.

दोन वर्षांपासून फुलांना मागणी नसल्याने आणि हरितगृहातील फूल शेती कमी केली आहे. मर्यादित स्वरूपात फुलांचे उत्पादन काढणे सुरू आहे. निर्यात करणे परवडत नसल्याने आमची स्थानिक बाजारावरच भिस्त आहे.
- रमेश पाटील, श्रीवर्धन बायोटेक,
कोंडिग्रे, जि. कोल्हापूर

बदलत्या हवामानाचा फटका फुलाच्या वाढीवर होत आहे. फुले लवकर परिपक्व होत असल्याने भविष्यातील काढणीच्या नियोजनात व्यत्यय येत आहे.
- सचिन पाटील, फूल उत्पादक, कांडगाव, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com