
Kolhapur Election Result : येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने (काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य, शिवसेना (शिंदे गट) बाजी मारली. १८ पैकी १६ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले.
शिव शाहू परिवर्तन शेतकरी विकास आघाडीचा (भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, आरपीआय, आसुर्लेकर गट) दारुण पराभव झाला. संस्था गटातील उमेदवार सुमारे पाच हजाराच्या फरकाने निवडून आले. ही निवडणूक फक्त पक्ष पातळीवर न होता गट पातळीवरही झाली. त्यामुळे दोन्ही आघाड्यात एकाच पक्षाचे दोन दोन गट सहभागी झाल्याचे चित्र होते.
सत्ताधारी आघाडीत माजी मंत्री हसन मुश्रीफ, विनय कोरे, पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, खासदार संजय मंडलिक, प्रकाश आबिटकर आदींचा समावेश होता.
तर विरोधी परिवर्तन आघाडीत धनंजय महाडीक, चंद्रदीप नरके, राहुल देसाई, राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील-सरूडकर, समरजीतसिंह घाटगे आदींचा समावेश होता. सत्ताधारी आघाडीला १६, विरोधी आघाडीला १ तर १ जागा अपक्षाला मिळाली.
ग्रामपंचायत व अन्य गटातील मतमोजणीमध्ये सत्ताधारी आघाडीचे उमेदवार प्रारंभापासूनच आघाडीवर राहिले. दुपारी एकच्या दरम्यान निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत विजय साजरा केला. प्रत्येक उमेदवाराचे समर्थक आपापल्या नेत्यांचा जयघोष करत होते.
विजयी उमेदवार असे...
सत्ताधारी आघाडीतील विजयी उमेदवार : राजाराम चव्हाण, प्रकाश देसाई, प्रा. शेखर देसाई, बाळासो पाटील, भारत पाटील - भुयेकर, सूर्यकांत पाटील, संभाजी पाटील, मेघा देसाई, सोनाली पाटील, शंकर पाटील, संदीप वरंडेकर, सुयोग वाडकर, शिवाजीराव पाटील, नानासो कांबळे, पांडुरंग काशीद, कुमार आहुजा हे विजयी झाले.
विरोधी गट : नंदकुमार वळंजू अपक्ष : बाबूराव खोत
‘त्या’ प्रामाणिक मतदाराचीच चर्चा
साखर कारखान्यांसह बाजार समित्यांच्या निवडणुकीत बरेच सर्वसामान्य मतदार मतांसह चिट्टीसुद्धा मतपेटीत टाकून राग व्यक्त करत असतात. कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत चिठ्ठ्यांबरोबर पैसेही टाकण्यात आले.
मतासाठी देण्यात आलेले एक हजार रुपये एका प्रामाणिक मतदाराने पाकिटात घालून मतपेटीत टाकून दिले.
पाकिट उघडले असता त्यामध्ये पाचशेच्या दोन नोटा आढळून आल्या. हे पैसे निवडणूक आयोगाकडे जमा करावेत, असेही या मतदाराने चिठ्ठीत सांगितले आहे. हा मतदार या वेळीच चर्चेचा विषय ठरला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.