
ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः होलिका उत्सवात धार्मिक महत्त्व असलेल्या गाठ्यांचे दर घाऊक बाजाराच्या दुप्पट किरकोळ बाजारात आहेत. घाऊक बाजारात ७० रुपयांना मिळणाऱ्या गाठ्या किरकोळ बाजारात मात्र १६० ते २०० रुपयांना विकल्या जात आहेत.
यंदा साखरेचे उत्पादन चांगले असून गेल्या सहा महिन्यांपासून दरही स्थिरावले असल्याने ठोक बाजारात गाठ्यांच्या दरात घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात मात्र याच गाठ्या महागड्या दरात ग्राहकांना खरेदी कराव्या लागत आहेत.
होळी अन् धुळवडीला आवश्यक असलेल्या गाठीचे उत्पादन (Sakahra Gathi Production) घरगुती कारखान्यांमध्ये वेगाने सुरू आहे. साखरेपासून तयार करण्यात येणारा गाठी हा पदार्थ केवळ होळीच्या वेळीच बाजारात विक्रीसाठी येतो. होळी आणि गाठीचे महत्त्व गुढीपाडव्याच्या दिवशीदेखील आहे.
साधारणपणे मराठी वर्षाचा शेवट आणि प्रारंभ गाठीशिवाय होत नाही. शहरात इतवारी परिसरात मोठ्या प्रमाणात गाठी तयार करण्याचे कारखाने आहेत.
दोन महिन्यांपासूनच या परिसरात गाठी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यंदा साखरेचे दर स्थिर असल्याने गाठ्या प्रति किलो ७० ते ८० रुपये दराने विकल्या जात आहे.
किरकोळ बाजारात मात्र, १६० ते २०० रुपये किलो दराने विकल्या जात आहे. त्यामुळे ग्राहकांना चढ्याच दरात गाठी खरेदी करावी लागत आहे. मजुरी,वाहतुकीचे दर वाढलेत त्या तुलनेत गाठी विक्रीचे दर वाढले नाहीत.
मजुरीचा दर
कारागिराला ४०० रुपये प्रतिक्विंटल मजुरी मिळते. मदतनीस महिलांना २५० रुपये रोज मजुरी मिळते. ठोक बाजारात ७० रुपये प्रति कि. किरकोळ बाजारात १२० ते २०० रुपये प्रति किलो असा गाठीचा दर आहे.
गाठीसाठी लागणारे मुख्य घटक
गाठीतयार करण्यासाठी सर्वात जास्त साखर लागते. किंबहुना मुख्य घटकच साखर आहे. साखरेसोबतच जाड दोरा, दूध पावडर, टिनोपॉल, हायड्रोपावडर आदी घटक वापरले जातात.
होळीच्या निमित्ताने गाठ्यांची मागणी वाढली असून दरात घसरण झालेली आहे. मागील वर्षी गाठी १०० ते १२० रुपये किलो होती. ती यंदा ७० रुपयावर आलेली आहे.
- आदर्श देशमुख,
संचालक, डी. बी. मार्ट
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.