
बाळासाहेब पाटील ः ॲगोवन वृत्तसेवा
नागपूर : कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना गायरान जमीन (Grazing Land) घोटाळाप्रकरणी बुधवारी (ता. २८) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी क्लीन चीट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा तीन जमीन घोटाळ्याचे आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. याप्रकरणी संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पवार यांनी केली.
वाशीम जिल्ह्यातील दोन आणि धुळे जिल्ह्यांतील एका गायरान जमीन हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित करत, तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांनी दलालांकरवी आर्थिक गैरव्यवहार करून जमीन हस्तांतरित केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. जर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा व्यक्ती किंवा कायदा मोडणारा व्यक्ती हा गुन्हेगार असेल तर आपण अशा व्यक्तीला शिक्षा देतो, त्यामुळे अशा व्यक्तीला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
तर धनंजय मुडे यांनी, चारचार प्रकरणे बाहेर येऊनही सरकारला साधे निवेदन करण्याचे आपण निर्देश देत नाही, किमान निवेदन द्यायला सांगा, अशी विनंती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केली.
प्रश्नोत्तरांचा तास संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे जमीन घोटाळ्याचा आरोप केला. श्री. पवार म्हणाले, ‘‘वाशीम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील गायरान जमीन खासगी व्यक्तीला वाटप केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
शांताबाई जाधव यांच्या अर्जावर वाशीम जिल्हाधिकाऱ्यांनी १७ मे २०१८ रोजी दिलेला आदेश रद्द ठरवत महसूल राज्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती स्वीकारली नसल्याचे सांगितले आहे. एका महिन्याच्या आत ही जमीन नियमानुकूल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणांत महसूल राज्यमंत्र्यांनी दलालांकरवी आर्थिक गैरव्यवहार केले आहेत. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. धुळे जिल्ह्यातील सिंदखेड, वाशीम जिल्ह्यातील कारंजा आणि काळीकारंद या गावांतील जमीन हस्तांतरणाचे आदेश दिले आहेत. या सर्व आदेशांची सखोल चौकशी व्हावी. ही चौकशी होईपर्यंत संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा.’’
आरोप केले काय निघाले? : मुख्यमंत्री
विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपांना उत्तर देत सत्तार यांची पाठराखण केली. ‘‘आरोप कोणीही करू शकते. आरोपांना आम्हीही उत्तर देऊ शकतो. पण तुम्ही आरोप करून काय मिळविले. त्यातून काय निघाले? ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशी गत झाली आहे. आम्ही तुमचे खोदू लागलो तर काय होईल?’ असा इशाराही दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.