
बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : वाशीम जिल्ह्यातील कथित गायरान घोटाळा, टीईटी घोटाळा (TET Scham) आणि सिल्लोड महोत्सवासाठी (Sillod Festval) १५ कोटी रुपयांची वसुली प्रकरणात विरोधकांनी पांढरे निशाण दाखविल्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चीट दिली. गायरान जमीनहस्तांतर प्रकरणात सत्तार यांनी विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर निवेदन दिले. ‘‘मी कुठलेही नियमबाह्य काम केलेले नाही. मला न्यायालय जी शिक्षा देईल, ती भोगण्यास तयार आहे,’’ असे सांगत त्यांनी विरोधकांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीच्या फुग्याला टाचणी लावली.
वाशीम जिल्ह्यातील घोडबाभूळ गावातील ३७ एकर १९ गुंठे जमीन बेकायदा खासगी व्यक्तीला दिल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत कडक ताशेरे ओढल्याने विरोधकांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज सोमवारी (ता. २६) बंद पाडले होते. त्यामुळे शिंदे गट बॅकफूटवर आला होता. तसेच सिल्लोड येथे एक ते १० जानेवारीदरम्यान आयोजित केलेल्या सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटी रुपयांच्या वसुलीचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. त्यावरूनही विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मंगळवारी (ता.२७) थेट पांढरे निशान दाखवत तलवार म्यान केली.
‘टीईटी’चा प्रश्न नाकारला
मागील आठवड्यात बुधवारी टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नाव आल्याप्रकरणी विचारणा केलेले प्रश्न वगळल्याने हा प्रश्न राखून ठेवला होता. तो प्रश्न बुधवारी येणे अपेक्षित होते. मात्र, हा प्रश्न विधानसभा अध्यक्षांनी विधानसभा नियम ३५ अ आणि उपकलमांन्वये नाकारल्याचे सांगितले. त्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विरोधकांना टार्गेट करत, ‘हा घोटाळा तुमच्याच काळात झाला होता. या घोटाळ्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव घेतले जात आहे. त्यांच्या मुलींना बेकायदा प्रमाणपत्र देऊन नोकरी दिल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, शिक्षण उपसंचालकांनी ही यादी अपात्र ठरवली आहे. त्यात सत्तार यांचा काहीही संबंध नाही. याउलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा घोटाळा झाला. त्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले. यावर विरोधक बोलत नाहीत. उठसूट काहीही आरोप करायचे. माध्यमांसमोर बोलायचे आणि आरोप करून मोकळे व्हायचे. असे चालणार नाही. आम्हीही त्याच पद्धतीने उत्तर देऊ.’असे सांगत त्यांना क्लीन चीट दिली.
टीईटी घोटाळा प्रकरणात फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतर विरोधकांनी निषेध करत सभात्याग केला. ही संधी साधत सत्तार यांनी गायरान जमीन घोटाळा प्रकरणी निवेदन केले. या वेळी विरोधी बाकावर कुणीही नव्हते. गायरान जमीन नियमानुसारच हस्तांतरित केली आहे. वारसा नोंदी आणि जमीन कसत असल्याचे पुरावे माझ्यासमोर आल्यामुळे तथ्यांच्या आधारे मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या निर्णयामुळे कुणाचा फायदा अथवा नुकसान झालेले नाही. तसेच सरकारचेही नुकसान झाले नाही. संबंधित जमिनीची सुनावणी महसूल राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे सुरू असेपर्यंत योगेश खंदारे यांनी १९४७ ते १९५२ पर्यंतचा जमीन पेरणीचा पुरावा सादर केला. हे प्रकरण न्यायपविष्ठ आहे. त्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल तो मला मान्य आहे,’’ असे निवेदन सत्तार यांनी केले.
‘सिल्लोड महोत्सवाप्रकरणी चौकशी करू’
सिल्लोड महोत्सवासाठी कृषी विभागाची यंत्रणा कामाला लावून १५ कोटी रुपयांची वसुली सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या बाबतचे पुरावे असल्याचेही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र, याप्रकरणी सत्तार यांनी मौन बाळगणे पसंत केले. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी बेकायदा बैठका घेऊन महोत्सवाची प्रवेशिका खपविण्याचे पत्र दिल्याचे प्रकरणही चर्चिले गेले. मात्र, सत्तार यांनी गायरान प्रकरणावर निवेदन करून सुटका करून घेतली. तसेच ‘सिल्लोड महोत्सवाबाबत पत्रक काढून पैसे घेऊन प्रवेशिका खपविण्याचा प्रकार झाला असेल तर चौकशी करून कडक कारवाई करू,’’ असे सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.