
Nashik MLC Election नाशिक : काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने नाशिक पदवीधर मतदार संघ (Graduate MLC Constituency) राज्यभर चर्चेत आला होता.
गुरुवारी (ता. २) रात्री उशिरा निकालाचे चित्र स्पष्ट झाले. यामध्ये सत्यजित यांनी बाजी मारली. वडील आमदार डॉ. सुधीर तांबे हे तीन वेळा या मतदारसंघात आमदार राहिले.
त्यांचा गड राखत विजयाचा चौकार मारला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा २९,४६५ मतांनी पराभव केला.
यंदाच्या पदवीधर निवडणुकीत डॉ. सुधीर तांबेच उमेदवार होते. परंतु, डॉ. तांबे यांनी थांबायचा निर्णय घेत सत्यजित यांना उमेदवारीसाठी पुढे केले; मात्र पक्षाचा ‘एबी फॉर्म’ नसल्याने त्यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यानंतर पुढे अनेक राजकीय घडामोडी झाल्या. अन् राज्यभर ही निवडणूक चर्चेत आली.
तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांच्या पाठीमागे उभे राहणे पसंत केले; मात्र तांबे कुटुंबीयांचा नाशिक विभागात असलेला जनसंपर्क त्यांना या निवडणुकीस बळ देणारा ठरला.
तांबेच्या विरोधात थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही रिंगणात उतरल्याने ही निवडणूक रंगतदार ठरली होती. पाटील यांनीही कार्यकर्त्यांच्या भेटी घेत मोट बांधली होती. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.
कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले होते. मतदार संघात २ लाख ६२ हजार ६७८ मतदारांपैकी एक लाख २९ हजार ३५६ (४९.२८ टक्के) मतदान झाले. यात तांबेंनी विजयश्री खेचून आणली.
वैधमतांपैकी पहिल्या पसंतीची मते :
रतन बनसोडे (२६४५), सुरेश पवार(९२०), अनिल तेजा (९६), अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर (२४६), अविनाश माळी (१८४५), इरफान मो इसहाक (७५), ईश्वर पाटील (२२२), बाळासाहेब घोरपडे (७१०), ॲड. जुबेर नासिर शेख (३६६), ॲड. सुभाष जंगले (२७१), नितीन सरोदे (२६७), पोपट बनकर (८४), सुभाष चिंधे (१५१), संजय माळी (१८७).
पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत आघाडी
मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या झाल्या. त्यामध्ये पहिल्या फेरीपासूनच सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली होती. पाचव्या फेरीअखेर त्यांना ६८ हजार ९९९ मते तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मते मिळाली.
पाचव्या फेरीअखेर त्यांनी एकूण विजयी मतांचा कोटा पूर्ण केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी त्यांना विजयी घोषित केले.
त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी जल्लोष केला. मात्र निकटवर्तीय मानस पगार यांचे अपघाती निधन झाल्याने सत्यजित यांनी विजयोत्सव साजरा न करण्याचे या वेळी जाहीर केले होते.
एकूण मतदार २,६२,६७८
एकूण झालेले मतदान १,२९,३५६
वैध मते १,.१६, ६१८
अवैध मते १२,९९७
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.