Jalyukt Shiwar Scam
Jalyukt Shiwar ScamAgrowon

वाशीम घोटाळ्याची फाइल दाबली

कृषी आयुक्तालयाच्या प्रशासकीय कारवाईच्या सूचनेचे पालन नाही

‘जलयुक्त’चे भ्रष्ट शिवार ः भाग ४

पुणे ः ‘‘जलयुक्त शिवार अभियानात (Jalyukt Shiwar Abhiyan) यवतमाळप्रमाणेच वाशीममध्येही कोट्यवधी रुपयांचा घोटाळा (Scam) झालेला आहे. कृषी आयुक्तालयाने (Agriculture Commissionerate) प्रशासकीय कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर देखील वाशीम घोटाळ्याची फाइल दाबून ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंत्रालयातून घोटाळेबाजांची पाठराखण झाली होती,’’ अशी धक्कादायक माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

‘‘जलयुक्त शिवार योजनेत (Jalyukt Shiwar Scam) वाशीमप्रमाणेच आम्ही कामे केली. मात्र वाशीमची चौकशी दाबली गेली आणि केवळ यवतमाळमधील घोटाळ्याची कागदपत्रे बाहेर काढण्यात आली आहेत. ठेकेदार व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी यवतमाळ व वाशीममध्ये एकाच नियमात व एकाच साच्यात संयुक्तपणे कामे केली आहेत. पण आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांनी केवळ यवतमाळमधील कर्मचाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी चौकशांचे कुभांड रचले, असा दावा यवतमाळमधील काही कर्मचाऱ्यांनी केला आहे.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यात कृषी अधिकारी आणि ठेकेदारांनी ६९७ कामांमध्ये १५ कोटी रुपये जादा लाटले आहेत. त्याबाबत स्पष्ट अहवाल असतानाही हडपलेली ९ कोटींची रक्कम माफ करावी, अशी संशयास्पद शिफारश कृषी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता वाशीम घोटाळ्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.

एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने सांगितले, की वाशीममध्ये जलयुक्त शिवार योजनेतील ठेकेदारांना अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद बिले मंजूर झाली ही वस्तुस्थिती आहे. कृषी आयुक्तालयाने आपल्या अहवालात त्याची स्पष्टपणे नोंद केली आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत कृषी विभागाने वाशीम जिल्ह्यात जलयुक्त शिवारात नाला खोलीकरणाची कामे करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केलेला आहे, असे आयुक्तालयातील संचालकानेच नमुद केले आहे. मुरमाच्या थराखाली खोदकाम नसावे असे आदेश असतानाही मऊ खडकाच्या थरामध्ये खोदकाम करणे ही बाब शासन निर्णयाचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करावी, असेही अहवालात म्हटले आहे. मात्र तो दडपण्यात आला आहे.’’

धक्कादायक बाब म्हणजे, वाशीममध्ये जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांची संशयास्पद कामे केलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्याच्याकडे यवतमाळमधील ‘जलयुक्त’च्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे काम सोपविण्यात आले. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले, की घोटाळ्याची दडपादडपी चालू असताना कृषी आयुक्तालय व मंत्रालय मूग गिळून होते. वाशीममधील गैरव्यवहार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून यवतमाळमध्ये गैरव्यवहार झालाच नाही, असा खोटा अहवाल देण्याचा प्रयत्न केला गेला. अशीच संशयास्पद कामे बुलडाणा जिल्ह्यात झालेली होती. त्यामुळे मंत्रालयातील तत्कालीन बुलडाणा ‘लॉबी’ने वाशीमचा गैरव्यवहार झाकला. चौकशीची फाइल आजपर्यंत दाबून ठेवण्यात वाशीममधील अधिकारी यशस्वी ठरले आहेत.

‘एसआयटी’तून निसटले घोटाळेबाज
महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव बिजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या एसआयटीपुढे जलयुक्तमधील घोटाळ्यांची कागदपत्रे येणार नाहीत, याची दक्षता यवतमाळ, वाशीम आणि बुलडाण्यातील अधिकाऱ्यांनी घेतली होती. त्यात पुन्हा ‘‘आम्ही जिल्हानिहाय घोटाळ्याची चौकशी करणार नसून, सरकारला फक्त चौकशीविषयी शिफारशी करणार आहोत,’’ अशी भूमिका एसआयटीने घेतली. त्यामुळे जिल्हास्तरांवरील घोटाळेबाज सहिसलामत निसटले, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
(क्रमश)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com