
Beekeeping Business पुणे ः गडचिरोली जिल्ह्यातील मोहगाव (ता.धानोरा) येथे २४ फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत मधमाशी जागरूकता (honey Bee Awareness) कार्यक्रमांतर्गत सात दिवसीय शास्त्रोक्त मधुमक्षिकापालन प्रशिक्षण (Beekeeping Training) कार्यक्रम यशस्वी पार पडला.
मधमाशीपालन, मध आणि प्रक्रियायुक्त उत्पादनांचे महत्त्व सांगून या विषयात उद्योजक घडवण्याच्या दृष्टीने विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
केंद्र शासनाने दहाहजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. त्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात मध उत्पादक शेतकरी कंपनी स्थापनेचे काम ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या संस्थेला मिळाले आहे. मोहगाव येथे ही कंपनी स्थापन करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ, आनंद (गुजरात) आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी माजी अन्नपुरवठामंत्री शोभा फडणवीस उपस्थित होत्या.
आदिवासी भागात रोजगार निर्मितीसाठी मधुमक्षिकापालन अत्यंत उपयोगी आहे असे सांगताना त्यांनी व्यवसायातून मिळणाऱ्या विविध उत्पादने व विक्री व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.
गडचिरोली जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रदीप तुमसरे यांनी मधमाशीपालनासाठी शासकीय योजनांची माहिती दिली. धानोऱ्याचे तालुका कृषी अधिकारी आनंद पाल म्हणाले, की शास्त्रीय पद्धतीने मधमाशीपालन करून परागीभवन झाल्याने पीक उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
प्रात्यक्षिकांसह माहिती
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) प्रशिक्षण समन्वयक आणि मधमाशी तज्ज्ञ प्रशांत गावडे यांनी मधमाशांच्या विविध जाती, व्यवसायासाठी योग्य जातींची निवड, त्यांचे परागीभवनात महत्त्व, स्थलांतर, कृत्रिमरित्या राणी माशीची पैदास, मधमाशांचे कीड-रोग, त्यांचे नियंत्रण, व्यवसायासाठी विविध अनुदानित योजना याबाबत मार्गदर्शन केले.
केव्हीकेचे तज्ज्ञ सचिन क्षीरसागर यांनी मधमाशांची हाताळणी, नैसर्गिक पद्धतीने शुद्ध मधाची काढणी, विविध साहित्य, मधाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी फुलोरा व्यवस्थापन आदी गोष्टींची प्रात्यक्षिकांसहित माहिती दिली.
धानोरा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष देवसाय आतला यांनी जागतिक बाजारपेठेत मधमाशीपालन उद्योगातील उत्पादनांचे महत्त्व विषद केले.
प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी दिनेश पनाशे यांचे सहकार्य लाभले. यावेळी धानोरा तालुक्यातील मोहगाव व परिसरातील २५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
प्रशिक्षण कार्यक्रम योजनेसाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे (आणंद) अध्यक्ष तसेच ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे (बारामती) अध्यक्ष राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले. ही योजना सुरुवातीला राज्यातील पाच जिल्ह्यांत राबविली जाणार आहे.
तथापी त्या व्यतिरिक्त अधिकाधिक शेतकरी, ग्रामीण युवक व महिला यांना त्याचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे केव्हीकेचे (बारामती) प्रकल्प समन्वयक व पीक संरक्षणतज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी म्हटले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.