शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू

आपल्यासोबत ३५ नव्हे तर ४० आमदार असून आणखी १० आमदार आपल्याला सामील होतील, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू
Eknath ShindeAgrowon

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरूच आहेत. आपण आज सकाळी एकनाथ शिंदे यांच्याशी तासभर चर्चा केली असून शिंदे आणि त्यांच्या बरोबर असलेले आमदार परत येतील, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. शिंदे यांच्यासाठी शिवसेना पक्ष सोडणे सोपे नाही आणि आमच्यासाठीही शिंदे यांना सोडणे सोपे नाही, असेही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड गेल्या चोवीस तासांत अधिकच तीव्र झाले असून शिवसेनेत उभी फुट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आपल्यासोबत ३५ नव्हे तर ४० आमदार असून आणखी १० आमदार आपल्याला सामील होतील, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना मंगळवारी रात्री उशिरा आसाममधल्या गुवाहाटी इथे नेण्यात आले.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र शिंदे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेनेने भाजपासोबत मिळून सत्ता स्थापन करावी, त्यात आपल्याला मंत्रीपद दिले नाही तरी चालेल, अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे. आज दुपारी (ता. २२) शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी राज्यपाल कोश्यारी यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन-तीन दिवसांपासून त्यांना ताप, खोकला असा त्रास होत होता. काल त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोश्यारी यांचा कार्यभार गोव्याच्या राज्यपालांकडे देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गोव्यात जातील, अशा बातम्या प्रसिध्द झाल्या. परंतु महाराष्ट्राच्या राज्यपालांचा कार्यभार गोव्याच्या राज्यपालांकडे सोपवण्यात येणार नाही, कोश्यारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपलब्ध असतील, असे राजभवनाने केलेल्या खुलाशानंतर स्पष्ट झाले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत असलेल्या आमदारांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. शिंदे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राऊत यांचे आरोप फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की संजय राऊत आमचे नेते आहेत. आपण कोणाचेही अपहरण केलेले नाही. सगळे आमदार स्वखुशीने आपल्यासोबत आलेले आहेत. आम्ही बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचे काम करत आहोत.

दरम्यान, अपक्ष आमदार आणि राज्यमंत्री बच्चु कडू हेही शिंदे यांच्या कथित बंडात सामील झाले आहेत. आमच्यासोबत शिवसेनेचे ३३ आमदार आहेत आणि काही अपक्ष आहेत. आज आणखी काही आमदार दाखल होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा आकडा ३८ -३९ पर्यंत जाईल. एकूण आमदारांची संख्या ५० पर्यंत नक्कीच जाईल. याशिवाय काँग्रेसचेही काही आमदार सोबत येणार आहेत, असे कडू म्हणाले. शिवसेनेचे ७५ टक्के आमदार शिंदे यांच्यासोबत असल्याने आम्ही इथे आलो. कोणतीही व्यक्तिगत नाराजी नाही. निधीतली विषमता आहे, शिवसेनेने त्याकडे लक्ष दिले नसल्याचेही कडू यांनी नमूद केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com