Madhavrao More
Madhavrao MoreAgrowon

Madhavrao More : शेतकऱ्यांचा झंझावात अखेर विसावला...

ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांचे निधनॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, मुलूखमैदानी तोफ म्हणून राज्यातील बळीराजाच्या कंठमणी असलेल्या माधवराव खंडेराव मोरे (Madhavrao More) नावाचा झंझावात अखेर बुधवारी (ता. २२) वयाच्या ८८व्या वर्षी कायमचा विसावला. गेल्या आठ-दहा दिवसांत नानांची प्रकृती वृद्धापकाळाने अधिकच खालावली होती, बुधवारी सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गुरुवारी (ता.३) पिंपळगाव बसवंत येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी झंझावाताला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या बळीपुत्रांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.


Madhavrao More
Madhavrao More : माधवराव खंडेराव मोरे यांच्या भावूक आवाहनाने थरारली सभा

नानांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. १९८० मध्ये शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची ठिणगी शरद जोशी यांनी जेव्हा नाशिकच्या भूमीवर प्रज्वलित केली, तेव्हा नाना त्यांच्यासमवेत या संघर्षात सोबत होते. अभ्यासू, प्रयोगशील व लढवय्या शेतकरी म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे. शेतकरी संघटना उच्चाधिकार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. १९८८ मध्ये पिंपळगाव बसवंत येथे ‘पिंपेन’ या ब्रॅण्ड खाली वायनरी उद्योग उभा केला होता.

Madhavrao More
Madhavrao More : शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माधवराव मोरे यांचे निधन

शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा. कृषिमूल्य आयोग बरखास्त करा. ‘कांद्याला मंदी, तर उसाला बंदी’ या मागण्यांसाठी अभूतपूर्व असे संपूर्ण राज्यभर मोठे आंदोलन उभारले होते. ऊस, कांदा या शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी संपूर्ण राज्यात शरद जोशी व त्यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे रोको, रास्ता रोको आंदोलने झाली होती. तर शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठी त्या वेळी सरकारकडून लाठीमार, अश्रुधूर, गोळीबार यांचा वापर केला होता. या वेळी झालेल्या लाठी हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तरीही शेतकरी आंदोलनाची धार कमी न होता वाढतच गेली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी शरद जोशी, माधवराव खंडेराव मोरे, राज्य साखर संघाचे तत्कालीन अध्यक्ष स्व. माधवराव बोरस्ते व इतर प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते‌. या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे १९८० मध्ये पहिल्यांदाच ऊसाला ३०० रुपये प्रतिटन, तर कांद्याला १०० रुपये क्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकरी संघटित झाल्याने संघटना गावागावांत पोहोचली. यात नानांचे योगदान तर मोठे होतेच, शिवाय त्यांचे विचार आणि जीवनकार्य सर्वांना प्रेरित करत असे. नानांनी काम थांबवल्यानंतर अनेक जण त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी जात. नानांची प्रकृती खालवत चालल्यानंतर त्यांचे चिरंजीव विक्रम व विश्‍वासराव यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या तब्बेतीची राज्यातील शेतकरी चळवळीतील नेत्यांनी आस्थेवाईकपणे सातत्याने चौकशी केली.

अंत्यसंस्कारास केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार दिलीपराव बनकर, डॉ. सुधीर तांबे, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, ज्येष्ठ नेते माजी प्रांताध्यक्ष रामचंद्र बापू पाटील, प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती डी. बी. मोगल, माजी सभापती माणिकराव बोरस्ते, गोदावरी बँकेचे संचालक प्रणव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, संघर्ष शेतकरी संघटनेचे संस्थापक हंसराज वडघुले, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पवार, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, वाइन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष जगदीश होळकर, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, कृषी उद्योजक श्रीकृष्ण गांगुर्डे, निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, अशोक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष इंद्रभान थोरात, ‘कादवा’चे अध्यक्ष श्रीराम शेटे, द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक दादा गायकवाड, भास्कर बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री दादा भुसे यांनी सकाळी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले, तर त्यांच्या निधनाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे, विठ्ठल वाघ यांनी शोक व्यक्त केला आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते, ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.माधवराव मोरे यांचा अल्प परिचय
माधवराव मोरे यांचा जन्म २२ मे १९३७ मध्ये झाला. पिंपळगाव हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण-जुनी मॅट्रिकचे शिक्षण घेतले. सन १९८० चे पिंपळगाव आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड गाजले. चांदवड येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये त्यांनी शेतकरी महिलांचे भव्य अधिवेशन भरविले. लाखोंच्या सभा गाजविताना उपस्थित शेतकऱ्यांना शिव्या हासडत स्वाभिमान जागविण्याची त्यांची वक्तृत्वशैली टाळ्या मिळवून जायची. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभारताना आध्यात्मिक, धार्मिक यांसह शेती विषयावर त्यांचे अफाट वाचन होते. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. सन १९६७ मध्ये त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना विकासाच्या योजना राबविल्या. भारत सरकारची शेतकऱ्यांबद्दलची धोरणे आणि त्यामुळे त्यांची झालेली दैन्यावस्था पाहून ते प्रचंड अस्वस्थ व्हायचे. शेतकरीविरोधी व्यवस्था मोडून काढण्यासाठी त्यांनी ८० च्या दशकात शेतकऱ्यांचे संघटन सुरू केले. द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी प्रवृत्त केले. ‘महाग्रेप्स’चे ते संस्थापक होते. हायब्रीड टोमॅटोची लागवड करणारे ते पहिले शेतकरी होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com