दर्जाहीन फळे-भाजीपाल्याने उत्पादकांची पीछेहाट

शेतीक्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर अनुदानासाठी बोगसगिरी आणि तत्सम शॉर्टकर्ट पर्यायाचा अवलंब करू नका. भाजीपाला आणि फळ उत्पादकांच्या पिछाडीचे हेच एक मुख्य कारण ठरले आहे.
Nitin Gadakari
Nitin GadakariAgrowon

नागपूर ः ‘‘शेतीक्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर अनुदानासाठी (Agriculture Subsidy) बोगसगिरी आणि तत्सम शॉर्टकर्ट पर्यायाचा अवलंब करू नका. भाजीपाला (Vegetable) आणि फळ उत्पादकांच्या (Fruit Producer) पिछाडीचे हेच एक मुख्य कारण ठरले आहे. विदर्भात उत्पादक हे भाज्या आणि फळांचा दर्जाच ठेवत नाहीत. त्यामुळे अपेक्षीत दर मिळत नाही. निर्यात तर दूरच राहिली. अशा भाजीपाला आणि फळांना स्थानिक बाजारपेठेतही अपेक्षित मागणी राहत नाही. त्यामुळे मोठ्या संख्येतील भाजीपाला आणि फळ उत्पादक काठावर पास होण्यालायक गुणासाठी देखील पात्र नाहीत, ’’ अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली.

Nitin Gadakari
Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट रोपनिर्मिती तंत्र

विदर्भातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी वनामती येथे मंगळवारी (ता.१६) आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी भाजीपाला, फळ उत्पादकांचा चांगलाच क्‍लास घेत त्यांचे कान टोचले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त मायी, आदिवासी अपर आयुक्‍त रवींद्र ठाकरे, मोरेश्‍वर वानखडे, मिलिंद आखरे, जयसिंग थोरवे, कृषी व्यवसाय तज्ज्ञ डी. एम. साबळे, कृषी विद्यापीठाचे कुलसचिव सुरेंद्र काळबांडे, अजय कडू, राजेश ऊरकुडे, दीपक झंवर आदी उपस्थित होती. शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये ढगा येथील युवराज ठाकरे या दिव्यांग युवकासह त्यांच्या कंपनीतील संचालकांचा या वेळी गौरव करण्यात आला.

गडकरी म्हणाले, ‘‘अनुदानासाठी फ्रॉड करण्याचे प्रमाण वाढले आहे. सोबतच अनेक प्रकारचे शॉर्टकट यशस्वी होण्यासाठी अवलंबिले जात आहेत. मात्र असे करताना शेतमालाची प्रत राखली जात नसल्याचे वास्तव आहे. परिणामी निर्यातच काय तर स्थानिक बाजारातही अशा शेतमालाला मागणी राहत नाही. शेतकऱ्यांनी शासन आणि परमेश्‍वर या दोघांच्या भरवशावर न राहताच शेतमालाचा दर्जा राखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.’’

Nitin Gadakari
Ethanol : इथेनॉलकडे साखर वळवण्याचे प्रमाण चार वर्षांत अकरापट

सत्याचा काळ हा स्पर्धेचा आणि त्यातून निर्माण झालेल्या गुणवत्तेचा आहे. ग्राहक चांगल्या प्रतीच्या मालासाठी कितीही पैसे खर्च करण्यास तयार आहे. त्यासाठी त्याला मालाची गुणवत्ता त्यानुरूप हवी आहे. शेतीला विविध कामांसाठी वीजपुरवठा गरजेचा राहतो. माझी पत्नी शेती सांभाळते; त्यावेळी पाणी उपसा करण्यासाठी दुपारी वीजच राहत नसल्याचे तिने सांगितले. त्यावेळी शेतीसमोरील विजेच्या प्रश्‍नाबाबत कळाले आणि सोलरचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला. यापुढील काळात सौर ऊर्जेवर आधारित सयंत्राचा वापर करणार आहे,’’ असेही गडकरी म्हणाले. मोरेश्‍वर वानखडे यांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला.

‘मलाच गंडविले’

‘‘वरुड, मोर्शी भागात दुय्यम प्रतीच्या खुंटावर कलम बांधण्याची बदमाशी होते. खरेदी केलेल्या रोपांची लागवड विश्‍वासाने शेतकरी करतो. पाच वर्षे संगोपन केल्यावर या झाडांना फळधारणाच होणार नसल्याचे त्याला कळते आणि तो नैराश्‍यात जातो. वरुड, मोर्शी भागातील रोपवाटीकांमधून रोपांची खरेदी केलेल्या अनेक शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे समोर आले आहे. शेतकरी नाही तर माझी देखील रोपांच्या खरेदीत या फसवणूक झाली,’’ असे गडकरी या वेळी म्हणाले.

‘‘माझ्या बागेतही रोगट आणि फळधारणा न होणाऱ्या खुंटावरील कलमांचा पुरवठा या भागातून झाला. अशा प्रकारावर नियंत्रणाची गरज आहे.’’

- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.

नागपुरात होणार सेंद्रिय मॉल’

‘‘सेंद्रिय शेतमाल उत्पादन आणि विपणनासाठी वर्धा रस्त्यावर लवकरच चार एकरांवर सेंद्रिय मॉल उभारण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्याला आपली सेंद्रिय उत्पादने विकता येतील. त्यांच्या तपासणीसाठी याच परिसरात प्रयोगशाळा उभारली जाईल,’’ असेही गडकरी यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com