
गुहागर, जि. रत्नागिरी ः सेंद्रिय शेती (Organic Farming) करणारे प्रयोगशील शेतकरी विजय माळींनी वेळंबमध्ये एसके ४ हळदीच्या वाणाची लागवड (Turmeric Cultivation) केली होती. सेंद्रिय खतांबरोबरच जीवामृत दिल्याने त्यांच्या शेतात ७.३० किलोचा हळदीचा गड्डा (Turmeric Rhizome) तयार झाला.
हळदीच्या एका कांद्यापासून आजपर्यंत केवळ ५ किलो गड्डा मिळाल्याची नोंद आहे. त्यामुळे विजय माळींच्या ७.३० किलो हळदीच्या गड्ड्याने नवा विक्रम केला आहे.
गुहागर तालुक्यातील वातावरण व जमीन हळदीच्या उत्पादनासाठी पोषक आहे. त्यामुळे हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढावी म्हणून पंचायत समिती गुहागरतर्फे हळद लागवडीची स्पर्धाही घेण्यात आली आहे.
सर्वात मोठा गड्डा उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्याला प्रथम क्रमाकांसाठी अडीच हजार, द्वितीय क्रमांकासाठी दीड हजार आणि तृतीय क्रमाकांसाठी एक हजार रुपये असे रोख बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
माळी हे कष्टाळू शेतकरी असून आपल्या शेतात भाजीपाला, कडधान्य लागवड करून तसेच छोट्या नारळ सुपारीच्या बागेवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
सेंद्रिय शेती हा त्यांच्या आवडीचा विषय असून त्यातील अधिक अभ्यासासाठी कृषी विभागाच्या विविध प्रशिक्षणांमध्ये सहभागी होतात. यातून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून ते आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करतात.
या स्पर्धेत भाग घेत प्रथमच माळी यांनी एसके ४ हळदीच्या वाणाची लागवड केली. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या माळी यांनी इथेही प्रयोग केला. कुजलेले शेणखत, बायोगॅस संयंत्रापासूनचे सेंद्रिय खत यांच्या जोडीला जीवामृताची मात्रा हळदीला दिली. ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीचा वापर केला.
या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांच्या शेतातील हळद चांगली पोसली गेली. एक कांदा रूजवल्यावर त्याला अनेक ठिकाणाहून हळदीची रोपे आली. स्वाभाविकपणे हळदीचे उत्पादन वाढले. हळद खणताना ७.३० किलोचा गड्डा मिळाल्यावर तातडीने त्यांनी पंचायत समिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
हळदीचा मोठा गड्डा तपासण्यासाठी आणि उत्पादन पाहण्यासाठी वेळंब ग्रामपंचायतीच्या सरपंच समीक्षा बारगोडे, स्पेशल कोकण -४वाणाचे प्रणेते सचिन कारेकर, कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राणे, पोलिस पाटील स्वप्नील बारगोडे यांच्या उपस्थितीत या गड्ड्याचे वजन करण्यात आले.
त्या वेळी हा गड्डा ७.३० किलोचा असल्याचे समोर आहे. आजपर्यंत इतका मोठा हळदीचा गड्डा कधीच पाहिला नव्हता, अशी टिप्पणी करत मंडणगडमध्ये यापूर्वी ५ किलो हळदीचा गड्डा सापडल्याचे गजेंद्र पौनीकर यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.