
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे सेस फंडाचे ४४ कोटी ९४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सोमवारी (ता.१३) सादर केले. अकरा लाखांचे शिलकी अंदाजपत्रक असल्याचे त्यांनी सांगितले.
या अंदाजपत्रकात कृषी विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतुदीमध्ये वाढ करून एकूण तीन कोटी ७० लाख रुपये, तर पशुसंवर्धन विभागासाठी तीन कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे हे अंदाजपत्रक पदाधिकारी नसल्याने प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी सादर केले. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणाकडे आणि त्यातील तरतुदींकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या वेळी मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार, सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार उपस्थित होते.
श्री. कोहिनकर यांनी २०२२-०२३ चे सुधारित, तर सन २०२३-२४ चे मूळ अंदाजपत्रक सादर केले. त्यात कृषी आणि पशुसंवर्धन विभागासह शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण विभागाला झुकते माफ देताना, विविध नावीन्यपूर्ण योजनांचाही समावेश केला आहे. त्यात शिक्षण विभागाला ५ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कृषी, पशुसंवर्धनच्या योजना आणि निधी
कृषी विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतुदीमध्ये वाढ करून एकूण तीन कोटी ७० लाख रुपये, कृषी अभियांत्रिकी योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचलित अवजारे, ट्रॅक्टर, रोटावेटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र रोटरी टिलर यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
जेणेकरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक अवजारांचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. शेतकरी व पशुपालकांसाठी कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी फिल्टर या सुधारित अवजारांचा वापर व्हावा म्हणून पूर्वी असलेली पाच लाख रुपये इतकी रक्कम तोकडी असल्याने त्यात वाढ करून ११ लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
पीक विविधकरण अंतर्गत कडधान्य व गळीत धान्य पिकामध्ये विविधिकरण करणे या नवीन योजनेसाठी दहा लाख रुपये, पशुसंवर्धन विभागासाठी ३ कोटी २५ लाख तरतूद केली आहे.
पशूंच्या दुग्धवाढीसाठी क्षार व जीवनसत्त्व औषध पुरवठा करण्यासाठी रक्कम ४० लाख रुपये, दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी वंध्यत्व निवारण कार्यक्रमांतर्गत रक्कम १० लाख रुपयांत वाढ करून रक्कम ही रक्कम आता ४० लाख रुपये पर्यंत वाढवण्यात आली आहे.
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतकरी व शेतमजुरांना चार शेळ्या व एक बोकडवाटप योजनेसाठी ४० लाख रुपये, पशुपालकांना मिल्किंग मशिन पुरविण्यासाठी रक्कम ३० लाख रुपये, स्तनदाह निर्मूलन कार्यक्रमासाठी १० लाख रुपये, देशी कुक्कुट पक्षी संगोपनास कुक्कुटपालकांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी एक लाखाची तरतूद केली आहे.
अर्थसंकल्पातील अन्य तरतुदी
आरोग्य विभागासाठी चार कोटी ३० लाख रुपये
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी औषधे खरेदीसाठी एक कोटी रुपये
श्वानदंश लस, सर्पदंश लस खरेदीसाठी २० लाख रुपये जिल्हास्तर/ तालुकास्तर/ प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर/उपकेंद्र स्तर वीज, पाणी, दूरध्वनी, इंधन, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सर्जन वाहन इंधन इत्यादी. योजनांसाठी एक कोटी रुपये
ग्रामीण जनतेला असाध्य रोगावरील उपचारासाठी अर्थसाह्य म्हणून ३० लाख रुपये
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राकडील जैवघनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी ३० लाख रुपये, तर कार्यालयाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १० लाख रुपये
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणासाठी रक्कम ४० लाख रुपये
लघू पाटबंधारे विभागासाठी २ कोटी रुपये
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.