
Turkey Millet Variety धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील प्रगतिशील शेतकरी किरण शिंदे यांनी बाजरीच्या तुर्की या देशी बाजरी वाणाची लागवड केली आहे. शिंदे यांचे पुत्र कुणाल यांनी आपल्या मित्रांकरवी तुर्कस्तानातून बाजरीचे हे वाण (Bajra Variety) मागवले असून पंधरा एकरांमध्ये याचा पेरा (Sowing) केला आहे.
या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या कणसाचा आकार सुमारे तीन ते चार फूट आहे. नुकतीच शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत बाजरीच्या वाणाची माहिती दिली. यावेळी बाजरीचे भले मोठे कणीस पाहून शरद पवारही अवाक झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपवरून अचानाक पायउतार होण्याचा निर्णय शरद पवार यांनी जाहीर केल्यानंतर राज्यभरातून कार्यकर्त्यांनी मुंबईची वाट धरली.
पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली.
या सर्व घडामोडी सुरू असतानाही शरद पवार आपले दैनंदीन कामे करताना दिसत होते. यावेळी शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि बाजरीच्या वाणाबाबतची माहिती दिली.
शिंदे यांनी पंधरा एकरात घेतलेल्या तुर्की बाजरीच्या पिकाची माहिती त्यांना दिली. सामान्य बाजरीच्या कणसापेक्षा या वाणाच्या कणसाचा आकार तीन ते चार फूट इतका असतो.
पवार यांनी बाजरीच्या कणसाचा आकार पाहिल्यानंतर आश्चर्य व्यक्त करत शिंदे यांच्याकडून याबद्दलची आणखी माहिती जाणून घेतली.
शेताच्या पाहणीसाठी स्वत: शरद पवार येणार
शेतकऱ्यांप्रती नेहमी आत्मीयता असणारे शरद पवार यांनी बाजरीच्या या अनोख्या वाणाची दखल घेतली असून त्यांनी कुणाल शिंदे यांना भेटीसाठी बोलविले आहे. तसेच बाजरीच्या या वाणाची पाहणी करण्यासाठी तुमच्या शेतात मी स्वत: येईल, असे आश्वासनही पवार यांनी शिंदे यांना दिले.
शेतकऱ्यांमध्ये कुतूहल
बाजरीच्या या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे कणीस तब्बल तीनते चार फुटांपर्यंत मोठे असते. या आगळ्यावेगळ्या वाणाची पेरणी केलेल्या बाजरीचे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये कुतूहल व आश्चर्य आहे. यासाठी परिसरातील अनेक शेतकरी शिंदे यांच्या शेतात शेतकरी पाहणी करण्यासाठी येत आहेत.
तुर्कस्तानातून मागविले बियाणे
शिंदे यांचा मुलगा कुणाल याने बारामती येथून कृषीच शिक्षण घेतले आहे. शिंदे पिता पुत्र सातत्याने आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात. यावेळी त्यांनी आपल्या शेतात तुर्की बाजरीचा प्रयोग केला आहे. यासाठी कुणालने त्याच्या मित्रामार्फत तुर्कस्तानातून या बाजरीच्या वाणाचे बियाणे मागविले असून त्यांना एक एकरात ४० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.