
अमरावती ः रेशीम शेतीच्या (Silk Farming) माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये आर्थिकस्थैर्य निर्माण झाले आहे. परंतु विक्रीचा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता. बडनेऱ्यातील पहिल्या रेशीम कोष बाजारपेठेमुळे (Silk Cocoon Market) त्यांचे हे कष्ट निश्चितच कमी होण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन अमरावती विभागीय कृषी संचालक किसन मुळे (Kisan Mule) यांनी व्यक्त केले.
विदर्भातील पहिल्या रेशीम कोष बाजारपेठेचा प्रारंभ अमरावती बाजार समितीअंतर्गत असलेल्या बडनेरा उपबाजारात सोमवारी (ता. ५) झाला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुळे पुढे म्हणाले, की आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेतकरी रेशीम कोष उत्पादन करीत आहेत. त्यातून चांगला पैसा मिळत असल्याने त्यांनी या क्षेत्राचा विस्तार केला. अनेक गावे आज रेशीम गाव म्हणून नावावरुपास आली आहेत. त्यामध्ये दिग्रस, पुसद तालुक्यांतील बहुतांश गावांचा समावेश आहे.
अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांतही रेशीम शेतीचा विस्तार होत आहे. हे आशावादी चित्र असले तरी विक्रीचा पर्याय शेतकऱ्यांना या भागात उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांना रामनगर तसेच राज्याच्या इतर भागात कोष विक्रीसाठी नेणे भाग पडत होते. मात्र बडनेरा येथे ही सुविधा उपलब्ध झाल्याने श्रम, वेळ वाचणार आहे.
रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत १३८२ शेतकऱ्यांच्या माध्यमातून १४४८ एकरांवर तुती लागवड करण्यात आली आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत ३८७ शेतकऱ्यांद्वारे ४२० एकरांवर तुती लागवड आहे. त्यामुळे रेशीम शेतीला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
वडनेरा बाजाराचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. रेशीम उत्पादक शेतकरी पूर्णीमा सवाई यांनी ही या वेळी मनोगत व्यक्त केले. अमरावती बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर, सहायक संचालक अरविंद मोरे, राजेंद्र वानखडे, व्यापारी शंकर जाधव, खेमराज सोनकुसरे, रफी शेख यांची या वेळी उपस्थिती होती. पहिल्याच दिवशी १० क्विंटल कोष खरेदी करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.