Reshim Sheti : कोकणात बहरणार रेशीम शेती

Sericulture : काजू, धान अशी पीकपद्धती असलेल्या कोकणात आता रेशीम शेती बहरणार आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

Nagpur News : काजू, धान अशी पीकपद्धती असलेल्या कोकणात आता रेशीम शेती बहरणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर १६ शेतकऱ्यांनी पुढाकार घेत प्रत्येकी एक एकरावर तुतीची लागवड केली आहे. रेशीम संचालनालयाने देखील रेशीमला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांतर्गत कोकणाकरिता स्वतंत्र रेशीम विभागाचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.

पाऊस अधिक पडत असल्याने कोकण विभागात धान लागवड क्षेत्र सर्वाधिक आहे. त्याकरिता लहान-लहान आकाराच्या धान बांधी तयार केल्या जातात.

मात्र धानाची उत्पादकता अपेक्षित नसल्याने या भागातील शेतकरी पर्यायाच्या शोधात होते. त्यांचा हा शोध रेशीम शेतीवर थांबला आहे. राजापूर (रत्नागिरी), लांजा या दोन तालुक्‍यांतील १६ शेतकरी त्यासाठी पुढे आले आहेत.

Silk Farming
Silk Industry : पांगरी शिवारातील वादळात रेशीम शेड झाले आडवे

रेशीम शेतीकरिता राज्याच्या इतर भागात ‘मनरेगा’तून अनुदान देण्याची तरतूद आहे. परंतु कोकण हा अपारंपरिक भाग असल्याने मनरेगा अनुदान योजनेची अंमलबजावणी येथे होत नव्हती.

परंतू शेतकऱ्यांचा उत्साह पाहता लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास पंडित यांनी मनरेगा मूल्यांकनाकरिता मनुष्यबळ पुरविण्यासाठी अपेक्षीत सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

तूर्तास मनरेगाचा पर्याय उपलब्ध नसल्याने सिल्क समग्र- दोन नावांच्या योजनेत टाइप-१ प्रकारातील शेड उभारणीसाठी अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे.

Silk Farming
Silk Industry : कारागृहातील कैद्यांना रेशीम उद्योगाचे धडे मिळणार

सध्या रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी बांबूचा उपयोग करीत त्यावर ताडपत्री टाकून शेड उभारले आहे. झाडांची संख्या पाच ते साडेपाच हजार असावी, असा निकष आहे.

परंतु या भागात धान बांधी असल्याने एका बांधीत इतकी झाडांची संख्या बसणे शक्‍य नाही, त्यामुळे एका बांधीऐवजी दोन बांधीचा वापर याकरिता करावा, अशी सूचना शेतकऱ्यांना करण्यात आली आहे.

पीक फेरपालटासाठी माजी सैनिक वासुदेव घाग, अमर खामकर (हारगाव), हनुमंत विचारे (रावाचे गोठणे), हरिश्‍चंद्र पाटेकर (कोळंब), सुधीर पालकर (परत) यांनी पुढाकार घेत रेशीम शेतीत सरासरीपेक्षा अधिक उत्पन्न घेतले. त्यामुळे या शेतकऱ्यांचा रेशीम संचलनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तज्ज्ञांकडून सहकार्याची भूमिका

लांजा केव्हीकेचे डॉ. सुदेश चव्हाण, महेश महाले, संदीप देशमुख यांनी देखील रेशीम शेतीसाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी अपेक्षीत सहकार्याची भूमिका ठेवली आहे.

गडहिंग्लज अंडीपुंज निर्माण केंद्राचे रेशीम अधिकारी अनिल संकपाळ, ज्येष्ठ तांत्रिक सहायक डॉ. भगवान खंडागळे, माजी रेशीम विकास अधिकारी रमेश बाळाजी हांडे हे लांजा तालुक्‍यातील आहेत. त्यांच्याकडून देखील शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे.

कोकणात देखील रेशीम शेती शक्‍य होते याला प्रोत्साहन मिळावे याकरिता रेशीम संचालनालयाने स्वतंत्र कोकण विभाग रेशीम कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला सादर केला आहे. आस्थापनानिहाय कर्मचारी संख्यादेखील त्यात नमूद करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात आदिवासीबहुल गावे अधिक आहेत. त्यांनाही समृद्ध करता यावे याकरिता नाशिक विभागही नव्याने निर्माण करण्याचे रेशीम संचलनालयाने प्रस्तावित केले असून प्रस्ताव शासनाला दिला आहे.
महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम संचालनालय, नागपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com