
गेवराई जि. बीड ः प्रतिकूल परिस्थितीही साथ देण्याचे काम रेशीम उद्योग (Silk Industry) उद्योगाने केले असून हा उद्योग काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव व जिल्हा रेशीम विकास अधिकारी, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने महारेशीम अभियानाअंतर्गत आयोजित एक दिवशीय रेशीम कीटक संगोपन प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. लटपटे बोलत होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून भा. प्र. से. आदित्य जीवने, प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी (रोहयो) मच्छिंद्र सुकटे, नायब तहसीलदार सत्यकुमार कदम, जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार, कार्यक्रम समन्वयक प्रा. दिप्ती पाटगावकर, आर. बी. अट्टल उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कीटकशास्त्रज्ञ डॉ. भैय्यासाहेब गायकवाड यांच्या ‘रेशीम उद्योग शेतीस एक जोडधंदा’ या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.
डॉ. लटपटे यांनी तुती लागवडीसाठी जमिनीची निवड, मशागत, वाण निवड, तुती बेणे निवड व प्रक्रिया, लागवड पद्धती, खत मात्रा, आंतरमशागत आणि पाणी व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. तसेच कीटक संगोपनगृह, निर्जंतुकीकरण, अंडीपुंज वाहतूक, रेशीम कीटकावरील येणारे रोग, उझी माशीचे व्यवस्थापन ावर माहिती दिली.
यावेळी श्री. जीवने म्हणाले, बीड जिल्ह्यात गेवराई तालुका रेशीम शेतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नव्याने रेशीम उद्योगात येत असलेल्या शेतकऱ्यांनी तांत्रिक माहितीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. श्री. सुकटे म्हणाले, शेतकऱ्यांनी वेळोवेळी तज्ज्ञांसोबत समन्वय साधावा. शेतीला जोडधंदा म्हणून रेशीमशेती करावा असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. पवार यांनी रेशीम शेतीसाठीच्या विविध योजनांची माहिती व फायदे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भैय्यासाहेब गायकवाड तर प्रस्ताविक प्रा. पाटगावकर यांनी केले. आभार प्रदर्शन महादेव डिगोळे यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. हनुमान गरुड, डॉ. तुकेश सुरपाम, प्रा. किशोर जगताप, प्रा. गणेश मंडलिक, महादेव डिगोळे, संजय हरसुले, अमोल सोनटक्के व संदीप राठोड यांनी परिश्रम घेतले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.