Soybean Harvest :...म्हणून शेती करताना मनाचा संताप होतो

गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन काढणीला (Soybean Harvest) परतीचा पाऊस (Return Monsoon) मोठा नुकसानकारक ठरतोय. काढणीला आलेलं सोयाबीन या परतीच्या पावसात (Rain) सापडू नये म्हणून यावर्षीही प्रयत्न केले.
Soybean Harvest
Soybean HarvestAgrowon

गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन काढणीला (Soybean Harvest) परतीचा पाऊस (Return Monsoon) मोठा नुकसानकारक ठरतोय. काढणीला आलेलं सोयाबीन या परतीच्या पावसात (Rain) सापडू नये म्हणून यावर्षीही प्रयत्न केले. गुत्तेकऱ्यांना त्यांनी मागितलेला दर दिला. (सात बॅगला ३५ हजार) तरीही त्यांनी वेळेत काम केलं नाही. त्यांच्या आवाक्यापेक्षा कितीतरी अधिक गुत्ते घेतल्यावर दुसरं काय होणार? त्यांना मी दोष देत नाही...मनुष्य स्वभाव आहे.

भरपूर कमाईचे हेच तर दिवस आहेत..गेल्या आठवड्यात तीन बॅगची काढणी झाली होती. दसऱ्यादिवशी सकाळी येण्याचं कबूल करूनही गुत्तेकरी आले नाहीत. रात्री पावसाचे दोन सटकारे आले. रात्री टीपटीप सुरूच होती. सकाळी थेंब सुरूच होते. तरीही जमेल तेवढं सोयाबीन काढावं असा माझा आग्रह होता.

अकरा वाजेपर्यंत गुगलवर कमी पाऊस दाखवत होतं. त्यामुळे गुत्तेकऱ्यांना निरोप दिला. नऊ वाजता काम सुरू झालं. पावसाचा अंदाज घेत, तास-दीड तास सोयाबीन काढलं की, ते गोळा करून बनमीवर टाकायचं असा कार्यक्रम केला.

सायंकाळी तर नुसतं पळावं लागलं. समोरून पाऊस येणार हे स्पष्टपणे दिसत होतं. काढलेलं सोयाबीन गोळा करून, बनीमवर ताडपत्री झाकेपर्यंत पाऊस सुरू झाला.नंतर वाढला..तो थांबून थांबून चालूच आहे.

शारीरिक कष्टाचा अजिबात त्रास होत नाही. मी तो मस्त एन्जॉय करतो. पण या पळापळीचा ताण येतोच. चिडाचीड होते...याचं कारण हतबलता. कितीही काम केलं, पळापळ केली तरी, हातातोंडाशी आलेला घास माणसं आणि निसर्गामुळे हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण होतेच. तेव्हा मी माझी अस्वस्थता, चीड, राग टाळू शकत नाही.

माझी शेतीतली आर्थिक गुंतवणूक बंद केली तर, कदाचित याचा त्रास होणार नाही. मी माझ्या आनंदासाठी म्हणून शेतीत गुंतवणूक करीत असलो तरी, नुकसान सहजपणे स्विकारावं अशी माझी स्थिती नाही. शिवाय हे सगळे पैसे बौद्धिक व शारिरीक कष्टातून मिळवलेले आहेत. ते असेच कुठून आलेले नाहीत!

अर्थात जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांची स्थिती कमी-जास्त अशीच असते. ज्यांची नुकसान पचवण्याची क्षमता अधिक, त्याला कमी त्रास. ज्यांचं वर्षभराचं जमा-खर्चाचं गणित सोयाबीन वा कापसावर अवलंबून आहे, त्यांच्या दु:खाचा विचारही अंगावर काटा आणतो. शिवारात निम्म्यापेक्षा अधिक सोयाबीन अद्याप रानावरच आहे. त्या सगळ्यांना फटका बसणारच. ज्यांची काढणी झालीय ते नशिबवान!

आज माझ्या या चिडचिडीबद्दल मित्राशी सहज बोललो. त्याला मी गौतम बुद्धांची एक कथा मागे सांगितली होती. रस्त्याने जात असताना एका गावात बुध्दांना लोकांनी खूप शिव्या घातल्या. बुध्द हसत हसत पुढे गेले. शिष्याने त्यांना विचारल, तुम्हाला त्या माणसांनी इतक्या शिव्या घातल्या तरी तुम्ही चकार शब्द बोलला नाहीत? बुध्द म्हणाले, मी त्यांची एकही शिवी घेतली नाही...

या किस्स्याची आठवण करून देऊन मित्र म्हणाला की, बुध्दांच्या कथा सांगणाऱ्या तुझ्यासारख्या व्यक्तीला चिडणं, जोरात बोलणं शोभत नाही.मी म्हटलं की, मी पण आता बऱ्यापैकी शिव्याकडं ,टीका-टिप्पणीकडं दुर्लक्ष करायला शिकलोय. शिव्यामुळं तसंही माझं काहीच नुकसान होत नाही, पण इथं थेट आर्थिक फटका बसतो.

पैसे आणि कष्ट मातीमोल होतात. त्यामुळं शेती करताना हा संयम टिकत नाही. इतरांचा हलगर्जीपणा, दुर्लक्ष, बेजबाबदारपणा, खोटेपणा जेव्हा माझ्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरतो, तेव्हा चिडचिड होतेच.मित्रा, हे टाळायचा एकच उपाय आहे,तो म्हणजे शेतीतून बाहेर पडणे.शंभर टक्के मी शेतीतून बाहेर पडलो तर मी शांत, संयमी, आदर्श, प्रेमळ असा माणूस नक्कीच बनेन...

निसर्गात राहायचं म्हणून शेतीत अडकलोय की, शेतीच्या मोहातून मला बाहेर पडता येत नाहीय,याचा मी गांभीर्याने विचार करतोय. पण काही वेळातच पाय आणि पिंढऱ्या मला दुसरा काहीच विचार करू देणार नाहीत असं दिसतंय. त्यामुळं हा प्रश्न आज तरी निकाली निघेल असं वाटत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com