
Solapur DCC Bank सोलापूर ः सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी (Debtor) एकरकमी परतफेड योजना (One Time Repayment Scheme) सुरू केली आहे.
त्याचा सुमारे २८ हजार शेतकऱ्यांना फायदा होणार असून, या शेतकऱ्यांना कर्जाच्या (Farmer Loan) व्याज आणि दंडात जवळपास ११० कोटी रुपयांची सवलत मिळणार आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
बँकेच्या वतीने थकबाकीदार शेतकऱ्यांकडील अल्प मुदतीचे कर्ज वसूल होऊन त्यांचा सात-बारा कोरा व्हावा, यासाठी एकरकमी परतफेड योजना सुरू कऱण्यात आली आहे.
अल्पमुदतीचे कर्ज बँक शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजाने देते, तर मध्यम मुदतीच्या कर्जाचा व्याजदर १३.५० टक्के आहे. ३० जून २०२० पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
या कालावधीत शेतकऱ्यांकडे असलेल्या थकबाकीवर नऊ टक्के व्याजदार आकारून कर्ज वसूल केले जाणार आहे. तर दीर्घ मुदतीचे कर्ज जिल्हा बँक शेतकऱ्यांना १४.७५ टक्क्यांनी देते. थकपुनर्रचना कर्जाचा दर १४.५० टक्के असून, रूपांतरित कर्जाचा व्याजदार दहा टक्के आहे.
या प्रकारातील शेतकऱ्यांना मुद्दलावरील रकमेला नऊ टक्क्यांनी व्याज आकारण्यात आले आहे. एकूण २८ हजार शेतकऱ्यांकडे जवळपास ५०० कोटी रुपयांची थकबाकी असून, बँकेने त्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी या योजनेतून ११० कोटी रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
११०० शेतकऱ्यांनी घेतला लाभ
जिल्हा बँकेने ही योजना सुरू केल्यापासून आतापर्यंत एक हजार १७९ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत २७ कोटी रुपयांची थकबाकी भरली असून, बँकेने त्यांना दंड व्याजात पाच कोटी ८० लाखाची सवलत दिली आहे. ३१ मार्चपर्यंत आणखी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
एप्रिलपासून पीककर्ज वाढवून देणार
सध्या जिल्हा बँकेकडून ऊस, डाळिंब, केळी, द्राक्ष अशा विविध पिकांसाठी हेक्टरी १ लाख १० हजारापर्यंत, तर कांद्याला एकरी २३ हजारांचे पीककर्ज दिले जात आहे. पण एप्रिलनंतर नव्या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना पीककर्जात दहा टक्यांची वाढ केली जाणार आहे, असेही बँकेकडून सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.