वरखते आणि मशागतीच्या प्रतीक्षेत कपाशी

राज्यात यंदा सोयाबीनचा (Soybean) तुलनेत कपाशीचा (Cotton) पेरा कमी झालेला आहे. मात्र, कडधान्य पेरता न आलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीचा पेरा वाढवलेला आहे.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon

पुणे : आधी पावसाअभावी कडधान्याचा पेरा (Pulses Cultivation) करता आला नाही आणि आता काही भागात संततधारेमुळे कपाशीच्या शेतांमध्ये मशागतीची कामे करता येत नाहीत, अशा कात्रीत काही भागातील शेतकरी सापडलेले आहेत.

राज्यात यंदा सोयाबीनचा (Soybean) तुलनेत कपाशीचा (Cotton) पेरा कमी झालेला आहे. मात्र, कडधान्य पेरता न आलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीचा पेरा वाढवलेला आहे. राज्यात २०१७ ते २०२१ पर्यंतच्या कापूस शेतीमधील पेरण्यांचा कल पाहिल्यास शेतकरी सरासरी ४२ लाखाच्या आसपास कपाशी पेरतात.

यंदा हाच पेरा आतापर्यंत ३९ लाख हेक्टरच्या पुढे गेलेला आहे. अर्थात, गेल्या वर्षी याच कालावधीत ३३-३४ लाख हेक्टरच्या आसपास पेरा झालेला होता. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कपाशीचा पेरा जास्त आहे. मात्र, अद्याप तो सोयाबीनच्या क्षेत्रापेक्षा कमी आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (कापूस) डॉ.निळकंठ पोटदुखे म्हणाले,“आतापर्यंत झालेल्या पावसामुळे चिंता करण्याजोगी स्थिती सध्या तरी उद्भवलेली नाही. मात्र, कपाशीच्या शेतामधील पाण्याचा निचरा करावा लागेल. वरखतांचा हप्ता देता आलेला नाही. उघडीप मिळताच खते द्यावी लागतील. त्यामुळे पिकांना जोम येईल. सततच्या ओलाव्यामुळे तणांचा त्रास वाढेल. त्यामुळे निंदणी व कोळपणीची कामे हाती घ्यावी लागतील. अर्थात, या सर्व कामांसाठी उघडीप अत्यावश्यक आहे.”

संततधार पावसामुळे कपाशीच्या रोपांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. अतिपावसामुळे शेतात माती वाहून ती रोपांवर बसल्यामुळे नुकसानीचे प्रकार काही ठिकाणी होत आहेत. मात्र, रोपांची कूज, मर असे प्रकार अद्याप निदर्शनास आलेले नाहीत, असे शास्त्रज्ञ सांगतात.

जिनिंग उद्योगालाही कपाशीचे पीक (Cotton Crop)अद्याप चांगल्या स्थितीत असल्याचे वाटते. खानदेश जीन प्रेस फॅक्टरी ओनर्स अॅन्ड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन म्हणाले,“पावसामुळे खानदेशात कपाशीचे नुकसान झालेले नाही. मात्र, राज्याच्या इतर भागात ५-१० टक्के हानी झाल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या हंगामातील कपाशीला प्रतिक्विंटल ६ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाल्यामुळे यंदा काही भागात शेतकऱ्यांनी पेरा वाढवला आहे. पाऊस उघडल्यानंतर मशागतीची कामे झाल्यास पिके जोमदार येण्याची शक्यता आहे. परंतु, काही भागात कपाशीला गरजेपेक्षाही जास्त दिवस पावसाला सामोरे जावे लागते आहे. तेथील पीक परिस्थिती नेमकी कशी राहील याचा अंदाज आताच लावता येणार नाही.”

..तर चांगले उत्पादन

‘‘राज्यात यंदा मुग आणि उडदाचा पेरा कमी झालेला आहे. पहिल्या टप्प्यात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना कडधान्य पेरता आली नाहीत. त्यामुळे त्यांनी कपाशीचा पेरा वाढवला आहे. नैसर्गिक आपत्तीतून यंदा कपाशी सावरल्यास गेल्या हंगामापेक्षाही चांगले उत्पादन यंदा येऊ शकते," असे विदर्भातील कापूस व्यापारी अनिल शहा यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com