
Nashik District Rabi Sowing : तालुक्यात गत पावसाळ्यात विविध महसूल मंडळात तब्बल दहा वेळा झालेली अतिवृष्टी व ऑक्टोबर अखेर पर्यंत बरसलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगाम (Kharif Season) अक्षरश: वाया गेला.
त्या पाठोपाठ आलेल्या रब्बी हंगामात (Rabi Season) संथगतीने होत असलेली पेरणी (Rabi Sowing) पूर्ण होण्यासाठी जानेवारीचा दुसरा आठवडा उजाडला. तालुका कृषी कार्यालयाच्या रब्बीच्या अंतिम अहवालानुसार तालुक्यात सरासरी लागवड क्षेत्राच्या १९९.६८ टक्के पेरणी (Rabbi Sowing) झाली आहे.
तालुक्याचे जून ते ऑक्टोबरपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान १०२६.५८ मिमी असताना प्रत्यक्षात १,४५०.६० मिमी पाऊस झाला. सरासरीपेक्षा ४१.३० टक्के अधिक पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके पाण्यात गेली.
लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना या एकाच हंगामात बसला आहे. परतीच्या पावसामुळे नोव्हेंबरपर्यंत अनेक भागातील शेतात पाणी होते. त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी एक महिना विलंबानेच सुरू झाली.
तालुक्याचे रब्बीचे सरासरी क्षेत्र १४ हजार ८०० हेक्टर आहे. त्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात २९ हजार ५५३ हेक्टरवर अर्थात जवळपास दुप्पट पेरणी झाली आहे. त्यात प्रामुख्याने तृणधान्यात ज्वारीची पेरणी २ हजार ९०८ हेक्टर क्षेत्रावर झाली असून, त्याची टक्केवारी १०४.१५ आहे.
गव्हाची पेरणी ५ हजार ४७० हेक्टरवर झाली असून, त्याची टक्केवारी १७०.६७ आहे तर मक्याची पेरणी ४ हजार ८३४ हेक्टर झाली असून, त्याची टक्केवारी १७१.६२ आहे. इतर तृणधान्ये १२७ हेक्टरवर पेरण्यात आले असून, त्याची टक्केवारी १७१.६२ आहे.
गतवर्षी नाममात्र झालेल्या गळीतधान्याच्या पेरणीत यंदा वाढ झाली असून, यंदा करडई ५ हेक्टरवर तर तीळ १४ हेक्टरवर पेरण्यात आले; शिवाय इतर गळीत धान्य २८ हेक्टर धरून एकूण ४७ हेक्टरवर तेलवर्गीय पिकांची पेरणी झालेली आहे.
दरम्यान, यंदा रब्बी हंगामात नगदी पीक म्हणून ९०३ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली असून, या व्यतिरिक्त २८३ हेक्टरवर धने (कोथिंबीर) पेरण्यात आले आहेत. यंदा उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश जलप्रकल्प शंभर टक्के भरलीत.
तसेच गावतळी व इतर सखल भागात अजूनही पाणी आहे. त्याचा फायदा विहीर बागायत क्षेत्राला होऊन, रब्बीत अधिक उत्पादनाची आशा आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.