टाल्कमचा डब्बा

बापाच्या धाकात तळहाताएवढ्या डब्यातली पावडर चार वर्ष गेली. जत्रतल्या टिकल्या, गंधाची बाटली, आई विना पोर म्हणून येत्या जात्या नात्यांनी दिलेले एक दोन रुपये, आईचा पदर बापाची माया... अवघं विश्व डब्बा झाला.
Powder
Powder Agrowon

पोरसवदा वयातील पोर ती. आईच्या पदराआडचं जग. 1960-70 चा काळ. कडक शिस्तिचा रांगडा बाप मुंबईला. लेकीवर अव्यक्त माया. अशाच एका उन्हाळ्यात तिला टाल्कमचा डबा घेवून आला. पावसाळा आला न् आईबरोबर पदराआडचं जगही संपलं.

बापाच्या धाकात तळहाताएवढ्या डब्यातली पावडर चार वर्ष गेली. जत्रतल्या टिकल्या, गंधाची बाटली, आई विना पोर म्हणून येत्या जात्या नात्यांनी दिलेले एक दोन रुपये, आईचा पदर बापाची माया... अवघं विश्व डब्बा झाला.

लग्न झालं. डब्बा सासरी आला. नवरा मुंबईला. फुलावानी पाय ढेकळं फोडू लागलं. गवताची वझी आणि कमरेला खुरपं. सासुरवास, पोरासाठी जाच. डोळ्यातली आसवं मडक्यांच्या उतरंडीत अडगळीच्या मडक्यात लपल्या डब्यात साचू लागली. नवऱ्याचं पत्र, आई बापाचा आठव, जगण्याचा आधार डब्बा झाला.

मुलं झाली. डब्बा मुलांचा खावू झाला. शाळेसाठी चार आने झाला. मुलांची मनी बॅंक झाला. सुना आल्या. आईंचा डब्बा कोपऱ्यात गेला. नातवंडं झाली. आजीच्या डब्याचा खेळ झाला. एके सकाळी म्हतारीचा डब्बा गायब. म्हतारी कासाविस. नजर ठरेना. डोळ्याला धारा.

नातवंडांच्या चकारी पालथ्या घातल्या, गोधड्या, खेळणी, सांदी कोपरं, गाडगी, मडकी, कपाटं, घासाचं वाफं, बांध, घरामागं... उकिरडाही चाळून झाला. डोळ्याच्या धारा थांबनात. कुणी विचारलं, आज्जी काय शोधतेय तं सांगता बी येईना. म्हतारीनं सांच्याला आथरुन धरलं.

डॉक्टर झाला. देवलशाचा गंडा झाला. बामनाकडं अड नड पाहून झाली. उतारे पडले, तरी फरक पडंना. आशा सुटायची वेळ. तशात एक तीन चार वर्षाचा नातू तिला हातात काहीतरी धरुन खबडाक खबडाक वाजवताना दिसला. आवाज ऐकला नी म्हतारी ताडकन उठली. नातवाला कडकडून मिठी मारली आणि पटापट मुके घेत सुटली. म्हतारीच्या डब्यात नातवानं गोट्या लपून ठेवल्या होत्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com