
Pune: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदौस चक्रीवादळामुळे (Mandous Cyclone) जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी (ता. ११) सायंकाळी तुरळक पावसाच्या (Rainfall) सरी बरसल्या. हवेली, आंबेगाव, इंदापूर, पुरंदर तालुक्यांत पाऊस पडल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. सोमवारीही (ता. १२) दिवसभर ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा, गहू, कांदा अशा पिकांवर होण्याची शक्यता आहे.
रविवारी (ता. ११) सकाळपासूनच वातावरण ढगाळ झाले होते, सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात तुरळक, तर काही ठिकाणी मध्यम प्रकारचा पाऊस झाला. या पावसाचा फटका तरकारी पिकांना बसणार आहे. चार-पाच दिवस असेच वातावरण राहिल्यास रोगराई पडून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी बटाटे काढण्याचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी कांदा चाळीतून कांदा पिशव्यात भरण्याचे कामे सुरू आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी टावरेवाडी भागांत रविवारी ढगाळ वातावरण तयार होऊन तुरळक पावसाने हजेरी लावली. या भागात बटाटा, भुईमूग, काढणीचे काम सुरू आहे. तसेच, बदलल्या हवामानामुळे कांदा व इतर पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता असून अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास कोबी, फ्लॉवर, गवार, भेंडी पिकांना मोठा फटका बसणार आहे. वीटभट्टी मालकांच्या विटा भाजून तयार आहेत; परंतु रविवारी अचानक तुरळक पाऊस सुरू झाल्याने वीटभट्टी मालकांची पळापळ सुरू झाली होती.
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर परिसरात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते, तर रात्री पावसाने सुरुवात केली. त्यामुळे इंदापूर बारामती रस्त्यावरील वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. पुरंदरमधील वाल्हे, दौंडज, पिसीट परिसरांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
ढगाळ हवामान व अवेळी पाऊस झाला तर पालेभाज्या, कांदा, मका, गव्हाच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. किडीच्या वाढत्या प्रादुर्भावाने येथील शेतकरीवर्ग आधीच मेटाकुटीस आला असून, असेच ढगाळ वातावरण अजून काही दिवस राहिले तर परिसरातील फळबागा देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानामुळे रविवारी (ता. ११) वातावरणात पहाटेपासूनच थंडीचा कडाका कमी झाला आहे.
सध्या परिसरात गहू, हरभरा ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसामुळे पिकांचे नुकसान होऊन पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
- माऊली कापसे, प्रगतिशील शेतकरी,
देऊळगाव राजे, ता. दौंड
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.