भोर, वरंधा घाटमार्गे एसटी सेवा सुरू

भोरवरून हिडोंशी वरंधा घाटमार्गे कोकणात जाणारी, तसेच कोकणातून भोरमार्गे पुणे येथे जाणाऱ्या गाड्या गेल्या अकरा महिन्यांपासून बंद होत्या, त्या आता सुरू करण्यात आल्या आहेत.
भोर, वरंधा घाटमार्गे एसटी सेवा सुरू
State TransportAgrowon

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एसटीची सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. भोरवरून हिडोंशी वरंधा घाटमार्गे कोकणात जाणारी, तसेच कोकणातून भोरमार्गे पुणे येथे जाणाऱ्या गाड्या गेल्या अकरा महिन्यांपासून बंद होत्या, त्या आता सुरू करण्यात आल्या आहेत. पिंपरी- चिंचवडहून कोकणात जाणाऱ्या बसही सुरू होणार आहेत, अशी माहिती भोर एसटी आगाराच्या सूत्रांनी दिली.

जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत वरंध घाटातील काही ठिकाणचा रस्ता वाहून, तसेच खचून गेला होता, तेव्हापासून एसटी सेवा बंद होती. बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने या संदर्भात केलेल्या प्रत्यक्ष पाहणीनंतर राष्ट्रीय परिवहन महामंडळाला या मार्गावरून गाड्या नेण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे भोर आणि महाड आगारप्रमुखांनी सांगितले.

भोर आगारातर्फे भोर- पुणे, भोर- महाड ही एसटी बस वरंध घाटमार्गे चालू करण्यात आली असून दोन दिवसांत भोर- पुणे- पोलादपूर ही बस सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर महाड-जळगाव, खेड चोरवणे, पिंपरी चिंचवड-केळशी याही एसटी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

पुणे, स्वारगेट, चिंचवड, भोर, महाड, मंडणगड, खेड, दापोली येथून दैनंदिन १८ गाड्या प्रवासी सेवा देत असून, सकाळी पावणेसहा वाजता सुरू होणारी प्रवाशांची सेवा रात्री १० वाजेपर्यंत सुरू असते; परंतु कोरोना काळ तसेच अतिवृष्टीत रस्ता नादुरुस्त असल्याने भोरमार्गे बस दोन वर्षे बंदच होती.

ही वाहतूक बंद झाल्याने हजारो नागरिकांना माणगावमार्गे अथवा महाबळेश्‍वरमार्गे पुणे येथे अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करून करावा लागत होता. ही बससेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे; पण पुढील काळात पावसाळा सुरू होत असल्याने ही सेवा अखंड राहणार का, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com