
Solapur News ‘‘केळी उत्पादक संघ, महाराष्ट्रच्या वतीने येत्या २३ एप्रिलला जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील प्रभाकर महाजन बहुद्देशीय सभागृहात सकाळी ११ वाजता केळी उत्पादकांची राज्यस्तरीय केळी उत्पादक परिषद आयोजिण्यात आली आहे,’’ अशी माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी दिली.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आजची स्थिती आर्थिकदृष्ट्या बिघडली आहे. त्यात निसर्गाच्या सततच्या फटक्याचा मोठा प्रभाव होत आहे.
सध्या अवकाळी पावसासह सीएमव्ही व्हायरस, बोगस रोपे, बोगस औषधे तसेच विमा कंपन्यांनी आणि व्यापाऱ्यांनी चालवलेली शेतकऱ्यांची पिळवणूक या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी केळीतील अभ्यासू आणि अनुभवी शेतकऱ्यांना एकत्रित करण्यासाठी आणि यावर चर्चा करण्यासाठी ही परिषद आयोजित केली आहे.’’
या परिषदेमध्ये आधुनिक केळीतील तंत्रज्ञान विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल. तसेच प्रक्रिया उद्योगाच्या अनुषंगानेही यामध्ये चर्चा होईल. मुख्यतः ‘केळी पीक रोग नियंत्रण’ या विषयावर डॉ. प्रशांत नाईकवाडी आणि ‘निर्यातक्षम केळी व सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्त्व या विषयी नंदलाल वसेकर मार्गदर्शन करतील.
अधिकाधिक शेतकऱ्यांनी या परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. या परिषदेत केळीरत्न गौरव पुरस्कार आणि आदर्श कृषी पत्रकार या पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. अतुल माने पाटील, विजयसिंह गायकवाड या वेळी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.