
Crop Damage Update छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) जोर कायम होता.
काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) तसेच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आता तोंडाशी आलेल्या रब्बीतील पिकांचे मोठेनुकसान (Crop Damage) झालं आहे. लातूर जिल्ह्यातील एका मंडलात अतिवृष्टी झाली.
उन्हाळ्यात पावसाळा असंच काहीस चित्र मराठवाड्यात अपवाद वगळता बहुतांश भागात दिसते आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५ पैकी ५६ मंडलांत अवकाळीचा दणका बसला.
वादळ गारपिटीसह आलेल्या या पावसाचा जोर १७ मंडलांत अधिक होता. या मंडळांलांमध्ये १० ते ३१ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.
चौका मंडलात ३१ मिलिमीटर, गारज २९ मिलिमीटर, अजिंठा २४, आमठाना २३.३, तर अंभई मंडलात २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सोयगाव मंडलातील कंकराळा, जरंडी, निंबायती, बहुलखेडा, कवली, तिखी-उमर-विहिरे-निमखेडी, नांदगाव तांडा, सावरखेड, लेनापुर आणि दत्तवाडी या गावांना शुक्रवारी दुपारनंतर गारपिटीचा तडाखा बसला.
सावरखेड, रेणापूर आणि दत्तवाडी या गावांना जवळपास अर्धा तास गारपिटीने झोडपून काढले. वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाटही मोठा होता.
जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, जालना, अंबड, बदनापूर, मंठा आदी तालुक्यांतील २९ मंडलांत कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला.
बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, धारूर, शिरूर कासार आदी तालुक्यांतील जवळपास ३९ मंडलांत वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस झाला.
या पावसामुळे काढणीला आलेले रब्बी ज्वारी व गव्हाचे पीक आडवे झाले. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले.
लातूर जिल्ह्यातील ६० पैकी रेनापूर तालुक्यातील दोन मंडळ वगळता ५८ मंडलांत अवकाळी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. जिल्ह्यातील २७ मंडलांत १० ते ३४ मिलिमीटर दरम्यान पाऊस नोंदल्या गेला. तर देवणी तालुक्यातील बोरोळ मंडलात ६६.५ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली.
या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ज्वारी, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी काढणीला आलेली रब्बी ज्वारी भुईसपाट झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी २८ मंडलांत अवकाळी पावसाचा दणका बसला.
भूम, परंडा, उस्मानाबाद तसेच तुळजापूर तालुक्यातील काही मंडलांकडे मात्र अवकाळीची कृपादृष्टी राहिली. इतर तालुक्यांतील पाऊस झालेल्या २८ पैकी सहा मंडळालांत १४ ते २७ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.