संगमनेर, श्रीगोंदा तालुक्यांत वादळी पाऊस

नगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पूर्वमोसमी वादळी पाऊस पडत आहे.
संगमनेर, श्रीगोंदा तालुक्यांत वादळी पाऊस

नगर ः जिल्ह्यातील संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात गुरुवारी (ता. ९) सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसाने घरे, विजेचे खांब (Electricity Poll) पडले. पॉलिहाउस (Poly House), शेडनेटचेही (Shade Net) मोठे नुकसान झाले. संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथे घर अंगावर पडून तिघांचा, तर मालदाड येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला.

नगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पूर्वमोसमी वादळी पाऊस पडत आहे. गुरुवारी (ता.९) सायंकाळी संगमनेर तालुक्यातील खांडगाव, वडगाव पान, कोल्हेवाडी, सुकेवाडी, घुलेवाडी, पोखरी हवेली परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. या पावसाने अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. जनावरांच्या गोठ्यांचे, पॉलिहाउस, शेडनेटचे मोठे नुकसान झाले. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तालुक्यातील काही भागांत गारपीट झाली.

अचानक आलेल्या पावसामुळे, तसेच गारांचा मारा बसल्याने टोमॅटो, कांदा, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खांडगाव भागात वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला, असे येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी संदीप गुंजाळ यांनी सांगितले.

अकलापूर येथे अंगावर घराची भिंत पडल्याने विठ्ठल भीमा दुधवडे (वय ७५), हौसाबाई भीमा दुधवडे (वय ८०) व साहिल पिनू दुधवडे (वय १०) यांचा मृत्यू झाला. तर मालदाड येथे वादळी पावसात झाड अंगावर पडून सुरेखा राजू मधे (वय २८) यांचा मृत्यू झाला.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यात झालेल्या पावसाने ११६ घरांचे नुकसान झाले. त्यात साकूर मंडळात १३, संगमनेर संगमनेर मंडलात ३५, धांदरफळ मंडळात सात, समनापूर मंडळात दहा, तळेगाव मंडळात एक, पिंरपणे मंडळात ४९, घारगाव मंडळात एक घराचे नुकसान झाले. अकोले तालुक्यात राजूर, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गुरुवारी सायंकाळी पाचनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भंडारदरा येथे काजवे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची मोठी धावपळ उडाली. आंबा पिकाचे नुकसान झाले. श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील राशीन भागात जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com