
Jalna News : मॉन्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहावे. आठ दिवसांत परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे सादर करा.
सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने कामे करावी. पाटबंधारे विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नद्यांचे पूररेषाबाबतचे नकाशे तयार करून २० मेपूर्वी सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
मॉन्सून- २०२३ पूर्वतयारी आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (ता. १२) पार पडली. त्या वेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपस्थित होते.
जालना जिल्हा पूरप्रवण क्षेत्र असून, जिल्ह्यात गोदावरी, दुधना, केळणा, पूर्णा, गिरजा या प्रमुख नद्या आहेत. ७ मध्यम व ५७ लघू प्रकल्प आहेत. यामुळे जिल्ह्यातील पूररेषा आखणीचे काम तत्काळ पूर्ण होणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात असलेल्या विविध पाणी साठवण प्रकल्पासह साठवण तलाव, पाझर तलाव आदींची पाहणी संबंधित विभागाने करावी. ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असेल ती तातडीने करावी.
संबंधित विभाग व तहसिलदारांनी जिल्हा, तालुका, गाव पातळ्यांवरील परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे येत्या आठ दिवसांमध्ये सादर करावे.
नदी काठची गावे व संभाव्य पूरपरिस्थितीत इतर सुरक्षित ठिकाणी लोकांना स्थलांतरित करता येईल, यासाठी उपाययोजना कराव्या.
जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक १०७७ असून, हा क्रमांक भ्रमणध्वनी ऑपरेटर्सवरून लागेल याची खात्री बीएसएनल विभागाने करावे, असेही ते म्हणाले.
प्रकल्पाचे उपसे बंद करण्यात यावे...
‘अल निनो’च्या परिणामामुळे संभाव्य पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी लघू व मध्यम प्रकल्पाचे उपसे बंद करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी तहसिलदारांना दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.