
Pune News : शेतकऱ्यांना समृध्द करणाऱ्या ऊस उत्पादनात ‘हेक्टरी अडीचशे टन' ही नवी चळवळ राज्यात सुरू झाली आहे.
मात्र, या पिकातील बायोमासची क्षमता अफाट विचारात घेता भविष्यात या पिकाची वाटचाल प्रति हेक्टरी ६०० टनापर्यंत असल्याने ऊस उत्पादनात आणखी वाढ शक्य आहे. मात्र, त्यासाठी साखर कारखान्यांनी ऊस संशोधनाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असा निष्कर्ष कृषी शास्त्रज्ञांनी काढला आहे.
सहकार महापरिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘ऊस लागवडीची आधुनिक तंत्रे’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.योगेंद्र नेरकर आणि पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे माजी प्रमुख आणि ऊस पैदासकार डॉ.सुरेश पवार यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, ‘डीएसटीए‘चे अध्यक्ष शहाजी भड तसेच राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
ऊस पैदासकार डॉ.पवार म्हणाले की, शास्त्रोक्त नियोजन केल्यास ज्वारीसारखी कमी पाण्यात भरपूर उत्पादन देण्याची क्षमता उसात आहे. मात्र, ऊसशेतीत अशास्त्रीय माहिती पसरवत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे प्रमाण वाढते आहे. यामुळे शेतकरी संभ्रमात आहे.
अशावेळी साखर कारखान्यांची जबाबदारी वाढली आहे. न लोळणाऱ्या व सरळ वाढणाऱ्या, फुटवे एकसारख्या देणाऱ्या, पक्व होताना पालापाचोळा आपोआप गळून पडणाऱ्या, कीड- रोगांना प्रतिकारक, क्षारपड व अतिपावसात तग धरणाऱ्या आणि कमी वेळेत येणाऱ्या जाती तयार होत आहेत. त्या शेतकऱ्यांपर्यंत नेल्या पाहिजे.
संशोधनातील साखर कारखान्यांचा सहभाग कमी झाला आहे. जनुकीय संशोधनावर लक्ष द्यावे लागेल, असे आवाहन करीत डॉ.नेरकर म्हणाले की, ऊस पैदासकारांनी जनुकीय अभ्यास वाढवावा. कारण, शेतकऱ्यांना नव्या जाती द्याव्या लागतील.
त्यासाठी उतिसंवर्धन, अणुरेणू रचना, जनुकीय स्थिती, संकरीकरण, वातावरण बदलाचे वनस्पतीवरील परिणाम, असे विषय बारकाईने अभ्यासावे लागतील.
याशिवाय शर्कराकंदाचे संशोधन वाढविल्यास येत्या १० वर्षात भारताला युरोपसाठी साखर निर्यातदार होण्याची संधी आहे. साखर उद्योगाला बिनचूक शासकीय धोरण, ग्रामीण नेतृत्व, शास्त्रज्ञांचे संशोधन, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी या उद्योगात सुप्त क्रांती घडवून आणतील.
उसात जैव आर्थिकता देण्याची क्षमता
ऊस पीक ऊर्जेची फॅक्टरी असून त्याची उच्च बायोमास क्षमता समृद्धी आणेल. राज्यात यंदा साखरेचे १३७ लाख टन उत्पादन झाले. देशाचे साखर उत्पादनही ३५६ लाख टनांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आता आपण ब्राझिलला मागे टाकणारी वाटचाल करीत आहोत.
हे पीक केवळ साखर देणारे राहिले नसून इथेनॉल,सहवीज, सीबीजीसह आता जैवरसायने, जैवविघटित प्लास्टिक, खते, खनिजे मिळवून देणार आहे. त्यामुळे जैव आर्थिकता देणारे पीक म्हणून ऊस उदयाला आला आहे, असाही निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.