
राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : ग्रामीण भागात शेतकरी लघू उद्योजिका घडाव्यात यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) जिल्ह्यात प्रथमच ऊस रोपवाटिका सुरू केली आहे.
रुई (ता. हातकणंगले) येथे ही रोपवाटिका सुरू आहे. या रोपवाटिकेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळाला आहे. रोपवाटिकेतून आतापर्यंत लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.
महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरू करणे व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी माविमच्या वतीने प्रयत्न केले जातात.
यातूनच रोपवाटिका सुरू करण्याचा पर्याय समोर आला ‘माविम’ स्थापित बचत गटातील महिलांची ऊस रोपवाटिका असावी.
ज्यामुळे महिलांना रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळेल या संकल्पनेतून ऊस रोपवाटिका सुरू करण्याचे निश्चित झाले. यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
‘माविम’मार्फत स्थापित ६ लोकसंचलित साधन केंद्रांतील ५ महिला अशा एकूण जिल्ह्यातून ३० महिलांची प्रशिक्षणासाठी निवड केली.
या महिलांना नाबार्ड कोल्हापूरच्या माध्यमातून डॉ. डी. वाय पाटील संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथे ५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय कोल्हापूर अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प, आधार लोकसंचलीत साधन केंद्र इचलकरंजी कार्यक्षेत्रातील रुई या गावात ऊस रोपवाटिका सुरू करण्याचे ठरले.
‘माविम’ मुख्यालयाकडून ऊस रोपवाटिका प्रकल्पास एकूण २१ लाख ४६ हजार ८७५ रुपये प्राप्त झाले आहेत. यामध्ये नवतेजस्विनीचा २५ टक्के निधी उर्वरित सहभाग हा बँक व आधार इचलकरंजी कार्यालयाचा आहे.
उसरोपवाटिकेमध्ये ८६०३२, ०२९५, १०००१, व ८०००५ च्या ऊस जाती विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत १ लाख ५८ हजार ५२० रोपे तयार करण्यात आली आहेत. त्यातील १ लाख १९ हजार ६३० रोपांची विक्री झाली.
त्यातून १ लाख ८५ हजार रुपये मिळाले आहेत. कांडी विक्रीमधून १३ हजार २५१ रुपये मिळाले आहेत. जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांचे मार्गदर्शन या रोपवाटिकेला असते.
प्रशिक्षित महिलांसाठी रोजगाराचा शाश्वत स्रोत
ज्या महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे अशा महिलांना प्राधान्यक्रमाने ऊस रोपवाटिकामध्ये काम करण्यासाठी घेण्यात आले.
सद्यःस्थितीत ऊस रोपवाटिका मध्ये एकूण ८ महिला काम करतात. त्यांना रोजगाराचा शाश्वत स्रोत निर्माण झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.