बुलडाणा ः शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही. शेतीचे सिंचन करण्यासाठी रात्रभर जागावे लागते. नुकसान होऊनही पीकविमा (Crop Insurance) मिळाला नाही, अशा विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शासनाने एक तर शेतकऱ्यांचे अस्तित्व मान्य करावे, अन्यथा इंग्रज सरकारप्रमाणे गोळ्या घालाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) देऊळगावराजा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. याबाबत देऊळगावराजा तहसीलदारांमार्फत सोमवारी (ता.२६) तातडीचे निवेदन पाठवले.
निवेदनात म्हटले, की जगाचा पोशिंदा हा मरणाच्या दारात उभा आहे. अनेक संकटांनी त्याला घेरले आहे. सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. हे सरकारला मान्य असूनसुद्धा त्या नुकसानीचा पीकविमा व सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळालीच नाही. शेतकरी दिवसभर शेतात राबराब राबतो. तरीही त्याला रात्री ११ वाजेनंतर वीज देऊन परत शेतात पाठवले जाते.
अंधारात साप, विंचू, रानडुक्कर, लांडगे, अस्वल, रोही, बिबटे यांचा वावर वाढलेला असल्याने अशा परिस्थितीत जीव धोक्यात घालून तो पिकांना पाणी देण्यासाठी जातो. भाजीपाला पिकाचे भाव वाढले लोकांचे बजेट कोलमडत असल्याची ओरड होते. आज टोमॅटो, कोबी, मेथी व इतर सगळाच भाजीपाला फुकटात विकला जात आहे. उत्पादन खर्च निघेल एवढासुद्धा भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या पाच दिवसांत मान्य कराव्यात, अशी मागणी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष मधुकर शिंगणे, जिल्हा सरचिटणीस शेख जुल्फीकार शेख यासीन, तालुकाध्यक्ष गणेश श्रीराम शिंगणे, गजानन साहेबराव गुडघे, अंबादास बुरकूल, वसंतराव हिंमतराव पाटील, शेख मजीद शेख हमजा, शेख अनिस शेख नजीर, गुलाब नबी, विजय भास्कर जाधव यांच्यासह इतरांनी निवेदन दिले.
...या आहेत मागण्या
दिवसा वीज द्यावी.
पीकविमा तत्काळ जमा करावा.
भाजीपाला पिकासह सर्व पिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा.
तुटपुंज्या पीकविमा मिळालेल्या शेतकऱ्यांना भरीव पीकविमा द्यावा.
अतिवृष्टीची जाहीर केलेली मदत तत्काळ द्यावी.
शासकीय कार्यालयामध्ये ३५३ सांरख्या विविध कलमांचे फलक तत्काळ हटवावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.