
Pune News : खरीप हंगामात दरवर्षी मोठ्या प्रमाणात बियाण्यांचा पुरवठा होतो. त्या वेळी काही कंपन्या दुकानदारांमार्फत बोगस बियाण्यांची विक्री करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. ते होऊ नये, यासाठी कडक कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री व राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
खरीप हंगामपूर्व आढावा बैठक विभागीय आयुक्तालय येथे शुक्रवारी (ता. १२) आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी श्री. पाटील बोलत होते. बैठकीप्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, खासदार श्रीरंग बारणे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवडी,
आमदार संजय जगताप, भीमराव तापकीर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, ‘आत्मा’चे संचालक विजय हिरेमठ,
जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख, जलसंपदाच्या मुख्य अभियंता सुनंदा जगताप यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. या वेळी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. पाटील म्हणाले, की हवामान विभागाने नुकताच पहिल्या टप्प्यातील पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार जून, जुलैमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या वेळी दुबार पेरणीचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे कृषी विभागाने ही गरज लक्षात घेऊन आताच बियाणे मागणीचे प्रमाण वाढवावे.
जेणेकरून खरिपात दुबार पेरणीच्या वेळेस फारशा शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. यासोबत बोगस खते, बियाणे, कीटकनाशक विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे निविष्ठा मिळून उत्पादनात वाढ होईल. जिल्ह्यात उसाचे जिल्ह्यात मोठे क्षेत्र आहे. चालू वर्षी पावसाचे प्रमाण आहे. त्यामुळे कृषी विभागाने ऊस उत्पादकांना ठिबक सिंचन सक्तीने करावे, पाणी बचत होऊन उत्पादन वाढण्यास मदत होईल, अशा सूचना त्यांनी केल्या.
तसेच कृषी विभागाकडून ड्रोन योजनेचा लाभ देताना वैयक्तिक शेतकऱ्याऐवजी विकास संस्थांना प्राधान्य द्यावे, तशी अनेकांनी मागणी केली आहे. त्यामुळे व्यवसाय निर्मिती होऊन इतर शेतकऱ्यांना फायदा होईल. महावितरणकडून जे काही वीज जोडण्या दिल्या जातात. परंतु ज्यांनी पैसे भरले आहे. त्यांना तातडीने वीज जोडण्या द्याव्यात.
डोंगराळ भागात वाकलेले पोल, लोंबलेल्या तारा याची वेळीच दखल घेऊन दुरुस्ती कराव्यात. तसेच सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपासाठी प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊन दिवसा वीज मिळेल. त्याची संख्या वाढविण्याची गरज आहे, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.
पीक स्पर्धेतील शेतकऱ्यांचा सन्मान :
बैठकीप्रसंगी गेल्या वर्षी खरीप २०२२ मध्ये पीक स्पर्धेत उच्चांकी उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा चांदखेड (मावळ) येथील नितीन गायकवाड, चांगुणाबाई भिका गवारी (जुन्नर), मुरलीधर कवठे, शांताराम बोकड या शेतकऱ्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यातील ४८ हजार हेक्टरवरील ऊस पाचट कुजवले
पुणे जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. त्यापैकी ४८ हजार हेक्टरमधील साडेतीन लाख टन पाचट कुजवले आहे. त्याचा ऊस उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.