
Barsu Refinery Project ‘‘मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिताचे प्रकल्प राज्यामध्ये राबवीत होतो, ते प्रकल्प गुजरातला नेले. राख आम्हाला आणि रांगोळी तुम्हाला हे आम्ही खपवून घेणार नाही.
रिफायनरीसारखा (Refinery Project) विनाशकारी प्रकल्प गुजरातला न्या आणि आमचे तिकडे नेलेले प्रकल्प महाराष्ट्रात आणा,’’ अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली.
‘प्रकल्प नको म्हणून लोक विरोध करत असतील, तर शिवसेना म्हणून मी त्याला विरोध करणार,’’ असेही त्यांनी सांगितले.
प्रस्तावित बारसू रिफायनरीच्या अनुषंगाने धोपेश्वर-गिरमादेवी कोंड येथे ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख श्री. ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत, उपनेते भास्कर जाधव, माजी पालकमंत्री अॅड अनिल परब, रवींद्र वायकर, आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, ‘‘उपऱ्यांची सुपारी घेऊन कोकणातील गोरगरीब जनतेच्या घरांवर वरवंटा फिरवायची लाज त्यांना वाटत नाही. हे त्या उपऱ्यांचे दलाल आहेत. हे सरकार कधी पडेल माहीत नाही.
सरकारच्या खुर्च्या आता हलायला लागल्या आहेत, त्या खुर्च्या घट्ट पकडून ठेवा, नंतर लोक तुम्हाला सोडणार नाहीत. या भागामध्ये माझ्या नातेवाइकांची जागा असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र या ठिकाणी बसलेली सारी जनता ही माझी आहे.
मग ही जागा नेमकी कोणाची. रिफायनरी प्रकल्पासाठी लोकांवर शासन पोलिस बळाच्या माध्यमातून बळजबरी करीत आहे. लोकांच्या हिताचा हा प्रकल्प असेल तर त्यासाठी पोलिस बळाचे वापर का करावा लागतो,’’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासंबंधित प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘रत्नागिरीमध्ये उदय सामंत पडणारच आहेत. त्यामुळे त्यांनी आधी आपली खुर्ची सांभाळावी.
राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था झिम्मा फुगडी खेळत असल्यागत राज्यभरातील पोलिस बारसू येथे तैनात केले आहेत. कोविड काळातील पोलिसांच्या योगदानाचे आम्ही कौतुक केले होते.
मात्र लोकांवर दंडुके मारणाऱ्या पोलिसांनी आपली घरे महाराष्ट्रामध्ये आहेत हे विसरू नये. जे पोलिस दंडुके मारतात, त्या लाठ्या-काठ्यांचा आणि दंडुक्यांचा हिशेबसुद्धा आम्हाला घ्यावा लागेल,’’ असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रस्तावित बारसू रिफायनरीच्या अनुषंगाने बारसू परिसरातील कातळशिल्पांची पाहणी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख श्री. ठाकरे यांनी धोपेश्वर-गिरमादेवी कोंड येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना सरकावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, ‘‘बारसूमध्ये निर्मनुष्य जागा आहे, फार नुकसान नाही होणार नाही.
हा प्रकल्प आपल्यासाठी महत्त्वाचा आहे असे दिल्लीतले आणि आता सत्तेत असलेले सुपारीबाज गद्दार माझ्याकडे येऊन म्हणत होते. म्हणून मी या जागेसाठी प्राथमिक पत्र दिले होते. पण लोकांचे न ऐकता डोकी फोडा असे मी म्हणालो नव्हतो.
मस्ती चढलेल्या सरकारला राज्यभरातील पोलिस घेऊन बळजबरी करून प्रकल्प लादता येतो असे वाटत असेल तर राज्यातील जनता घेऊन बारसूत उतरू.
मी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आहे. प्रकल्पविरोधी लढा संपेपर्यंत आता थांबायचे नाही. मी तुमचा पुष्पगुच्छ तेव्हाच स्वीकारेन जेव्हा तुमचा लढा यशस्वी होईल.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.