
Water Storage News पुणे : उन्हाच्या झळा (Summer Heat) तीव्र होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात (Water Storage) झपाट्याने घट होत आहे. जिल्ह्यातील नीरा खोऱ्यातील (Neera Valley) पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ९.४९ टक्क्यांनी घट झाली आहे.
यंदा या खोऱ्यातील धरणांमध्ये एकूण ४८.३३ टीएमसीपैकी ३१.३१ टीएमसी म्हणजेच ६४.७८ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी याच काळात धरणांत ३५.९० टीएमसी म्हणजेच ७४.२७ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध होता.
पाणीसाठ्यात घट झाल्याने येत्या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
गेल्या वर्षी या खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणे तुडुंब भरली होती. धरणे भरल्याने पाण्याची चिंता काही प्रमाणात सुटली होती. परंतु मागील काही दिवसांपासून रब्बी, तसेच उन्हाळी हंगामासाठी पाणी धरणातून सोडण्यात आले होते.
त्यामुळे पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भाम आसखेड, आंध्रा, वडीवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांतील पाणीपातळी काही प्रमाणात कमी झाली आहे.
गेल्या महिन्याभरापासून तापमानात चांगलीच वाढ होत आहे. कमाल तापमानाचा पारा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांसाठी वीर आणि चासकमान या धरणांतून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.
सध्या वीर धरणातून डाव्या कालव्याला ४५० क्युसेक, तर उजव्या कालव्याला १५५० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. याशिवाय चासकमान धरणातून डाव्या कालव्याला ५३५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
सध्या पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, गुंजवणी, भाटघर या धरणांतील पाणीपातळी गतवर्षीच्या तुलनेत चिंताजनक असल्याचे दिसून येते.
पाटबंधारे विभागाकडून हा साठा पुरेसा असल्याचे सांगण्यात येत असले तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
नीरा खोऱ्यातील धरणनिहाय असलेला पाणीसाठा, गेल्या वर्षीचा पाणीसाठा : टीएमसीमध्ये
धरण -- उपलब्ध पाणीसाठा -- यंदाचा पाणीसाठा -- गेल्या वर्षीचा पाणीसाठा
पवना -- ८.५१ -- ४.७५ -- ४.८३
कासारसाई -- ०.५७ -- ०.३७ -- ०.४५
कळमोडी -- १.५१ -- १.४६ -- १.४८
चासकमान -- ७.५८ -- ४.२६ -- ५.४२
भामा आसखेड -- ७.६७ -- ५.५२ -- ५.८४
आंध्रा -- २.९२ -- २.२८ -- २.५२
वडीवळे -- १.०७ -- ०.६७-- ०.५५
शेटफळ -- ०.६२ -- ०.४८ -- ०४५
नाझरे -- ०.५९ -- ०.४४ -- ०.११
गुंजवणी -- ३.६९ -- २.७७ -- २.९२
भाटघर -- २३.५० -- १३.९९ -- १९.३७
नीरा देवघर -- ११.७३ -- ८.६५ -- ५.४३
वीर -- ९.४१ -- ५.९१ -- ५.४३
एकूण -- ४८.३३ -- ३१.३१ -- ३५.९०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.