Nagar APMC Election : बाजार समित्यांतून विधानसभेची रंगीत तालीम

नगर जिल्ह्यात कधी नव्हे त्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांत मोठा संघर्ष पहायला मिळाला. जोरदार- आरोप प्रत्यारोप झाले.
Nagar APMC Election
Nagar APMC ElectionAgrowon

Nagar Election Result : नगर जिल्ह्यात कधी नव्हे त्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांत मोठा संघर्ष पहायला मिळाला. जोरदार- आरोप प्रत्यारोप झाले. विधानसभा तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्याच्या निवडणूका लवकरच होणार असल्याने या निवडणुकांतून त्याची रंगीत तालीम पहायला मिळाली.

पहिल्या टप्प्यात झालेल्या सात बाजार समित्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसतेय. मोठा आर्थिक खर्च करत नेत्यांनी आपापली सत्ता राखली. पारनेर, संगमनेरमध्ये सत्तांतर करण्याचे भाजपचे स्वप्न मात्र धुळीस मिळाले.

नगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नगर तालुका, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, संगमनेर, राहुरी, पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक झाली. नगर शहरात असलेल्या तालुका बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची होती.

माजीमंत्री व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे अनेक वर्षापासून येथील सत्ता आहे. यावेळीही त्यांच्याच मंडळाने सर्व जागांवर मिळवत सत्ता जिंकली, मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या मंडळासमोर मोठे आव्हान उभे केले होते.

कर्डिले यांनी यावेळी सत्ता मिळवताना मोठा संघर्ष करावा लागला. राहुरीत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या गटाने सत्ता मिळवली.

राहुरीतील बराच भाग नगर विधानसभा व लोकसभेत येत असल्याने कर्डिले आणि खासदार डॉ. सुजय विखे यांना धक्का मानला जात आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष होते ते पारनेर व संगमनेर बाजार समितीच्या निकालावर. संगमनेरला माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कायम सत्ता आहे.

Nagar APMC Election
Vidarbh APMC Election : विदर्भात बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांच्या विरोधात पॅनेल उभे करून कडवे आव्हान दिले होते. निकालानंतर मात्र भाजपला येथे सपशेल हार मानावी लागली.

लोकसभेला पारनेरचे आमदार नीलेश लंके राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. त्यामुळे खासदार सुजय विखे व आमदार नीलेश लंके यांच्यातील संघर्ष नगर जिल्ह्याला सातत्याने पहायला मिळत आहे.

विखे यांनी पारनेर बाजार समितीतही महाविकास आघाडीविरोधात जोरदार तयारी केली. मात्र माजी आमदार विजय औटी आणि नीलेश लंके यांचे बाजार समितीत मनोमिलन झाले आणि निकालानंतर सर्व जागा जिंकून महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले.

Nagar APMC Election
Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यात आजी-माजी पालकमंत्र्यांना धक्का

येथेही विखे यांना सत्ता जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. पाथर्डीला आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादीचे नेते अॅड. प्रतापराव ढाकणे आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यात संघर्ष पहायला मिळाला.

येथे मोनिका राजळे यांनी सतरा जागा जागा जिंकत सत्ता परिवर्तन केले. कर्जत बाजार समिती भाजपच्या ताब्यात होती. आमदार राम शिंदे व रोहीत पवार यांच्यात कडवा संघर्ष येथे पहायला मिळाला. निवडणुकीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाजपकडे गेल्याने महाविकास आघाडीची मोठी अडचण झाली.

निकालानंतर भाजप व महाविकास आघाडीला समान नऊ जागा मिळाल्या आहेत. श्रीगोंद्यात बाजार समितीत वेगळेच राजकारण पहायला मिळाले. भाजप आमदार बबनराव पाचपुते व कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची युती झाली.

राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप, बाजार समिती फेडरेशनचे बाळासाहेब नहाटा आणि विखे समर्थक अण्णा शेलार पाचपुते-नागवडे यांच्या विरोधात एकत्र आले. येथे राहुल जगतापांनी तेरा जागा मिळवत सत्ता मिळवली. पहिल्या टप्प्यात महााविकास आघाडीची सरसी दिसली.

त्यातच कर्जत समान जागा मिळाल्या व श्रीगोंद्यात कमी जागा मिळाल्या तरी सभापती भाजपचा होईल असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी वक्तव्य केल्याने राजकीय जाणकारांच्या भुंवया उंचावल्या आहेत.

मताला मोठा दर..

विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्याच्या निवडणूका आगामी काळात होणार असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला कधी नव्हे ते यावेळी मोठे महत्त्व दिले गेले. सत्ता शाबूत ठेवण्यासाठी नेत्यांनी मताला मोठी किंमत मोजली.

पंधरा हजारांपासून तीस हजार रुपयांपर्यंत एक-एका मताला मोजले असल्याचे एका मतदाराने सांगितले. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी पैशाचा महापूर केल्याने मतासाठी पैसे दिल्याच्या बाबीवर मात्र कोणत्याही पक्षाचा नेता बोलत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com